रायगड जिल्ह्यात एका महिला सरपंचाचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात ही घटना घडली असून स्थानिक ग्रामपंचायतीच्या सरपंच असलेल्या महिलेचा मृतदेह जवळच्या एका जंगलात आढळून आला आहे. डोक्यावर लाकडाने हल्ला करून त्यांचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
सोमवार, २७ डिसेंबर रोजी महाड तालुक्यातील एक सरपंच या लाकडे गोळा करण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. पण बराच काळ लोटला तरी त्या परतल्या नाहीत. अशावेळी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नजीकच्या एका रस्त्यावरून गावातील एक व्यक्ती जात असताना त्याला लाकडाचा खच पडलेला दिसला. जवळ जाऊन बघता त्याला या महिला सरपंचांचा मृतदेह आढळला. हा मृतदेह विवस्त्र अवस्थेत होता. याबाबत त्याने स्थानिक पोलिस पोलिस स्थानकात माहिती कळवली.
हे ही वाचा:
कुर्ल्याच्या भाभा रुग्णालयाच्या छतावरून पडून कामगाराचा मृत्यू
राज्याचा आगामी अर्थसंकल्प नागपूरमधून
अटकपूर्व जामिनासाठी नितेश राणेंची कोर्टात धाव
अकबर साजरा करायचा ख्रिसमस! मुघलांना सेक्युलर दाखवण्यासाठी आव्हाडांची धडपड?
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून शवविच्छेदन अहवालानंतरच अनेक गोष्टी स्पष्ट होणार आहेत. हा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडल्यामुळे या महिलेवर अतिप्रसंग किंवा बलात्कार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पण शवविच्छेदन अहवाला नंतरच ते स्पष्ट होईल. दरम्यान पोलिसांनी आपला तपास सुरू केला असून त्या महिलेच्या पतीला बोलून त्यांच्याशी या संदर्भात विचारणा केली आहे.
या घटनेमुळे राज्यातील महिला अत्याचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्यातून गेल्या काही काळापासून महिला अत्याचार, बलात्काराच्या अनेक घटना पुढे येत आहेत. राज्यात या घटनांचा विचार करूनच शक्ती कायदा विधिमंडळात मंजूर करण्यात आला आहे. तरी देखील राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांना चाप बसताना दिसत नाही