तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सध्या राज्यातल्या हिंदूंच्या प्रश्नावर भाष्य करायला सुरवात केली आहे. आंध्रातील राजकीय विश्लेषकांच्या मते चंद्राबाबू हे राज्याच्या राजकारणात टिकून राहण्यासाठी हे करत आहेत.
२०१९ च्या लोकसभेपूर्वी चंद्राबाबूंनी एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी देशभर मोदींविरोधात प्रचारही केला होता. राज्यात त्यांनी काँग्रेस पक्षाशी युतीसुद्धा केली होती. परंतू २०१९ च्या निवडणुकीत त्यांना आंध्रच्या २५ पैकी केवळ ३ जागा मिळाल्या होत्या. दरम्यान त्याचवेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे विरोधक असलेल्या जगनमोहन रेड्डी यांना तीन चतुर्थाउंश बहुमत मिळाले होते.
“मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी ही ख्रिश्चन व्यक्ती २०१९ मध्ये सत्तेत आल्यापासून आंध्रप्रदेशातील हिंदूंचे धर्मपरिवर्तन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील हिंदू देवळांवर होणाऱ्या हल्ल्यांमागे स्वतः मुख्यमंत्र्यांचा हात आहे.” असा आरोप चंद्राबाबू नायडूंनी केला आहे.
चंद्राबाबू नायडूंनी अशी हिंदू हिताची भूमिका न घेतल्यास भाजपाला राज्यात आमंत्रण दिल्यासारखे होईल. असे झाल्यास नायडूंचे राजकीय अस्तित्वच उरणार नाही. असे विधान आंध्रमधील राजकीय विश्लेषक मंचला श्रीनिवास राव यांनी केले आहे.
२०१९ च्या निवडणुकीपूर्वी राहुल गांधींनीसुद्धा “जनेउधारी हिंदू” असल्याचा प्रचार केला होता. त्याचबरोबर अनेक मंदिरांमध्येही ते गेले होते. पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही आणि निवडणुकीत त्यांना स्वतःलाच पराभव पत्करावा लागला. तीच अवस्था चंद्राबाबूंची होणार का? अशी चर्चा आंध्रच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.