केंद्र आणि राज्य सरकारमधील वाद आता पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात भूमिपूजन केलेल्या नदी सुधार योजनेला ठाकरे सरकारने स्थगिती दिली आहे. या प्रकल्पावरील विविध आक्षेपांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ मार्चला पुण्याच्या दौऱ्यात नदी सुधार योजनेचे भू्मिपूजन केले होते. या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित होते. आता ठाकरे सरकारने नदी सुधार योजनेवरील आक्षेप, योजनेतील कामे, परिणाम या बाबींचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी नगरविकास, जलसंपदा आणि पर्यावरण खात्यातील सचिवांची समिती नेमली आहे. त्यानंतर येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये या समितीद्वारे अहवाल सादर करण्यात येणार असून त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात तातडीची बैठक होणार आहे. दोन्ही नेत्यांच्या बैठकीनंतर या प्रकल्पाबाबत निर्णय येण्याची शक्यता आहे. येत्या बुधवारी या संदर्भात तातडीनं बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा:
तेजस मोरे यांनी केले स्टिंग ऑपरेशन; प्रवीण चव्हाणांचा आरोप
वेस्ट इंडीजवर भारतीय महिला संघाचा १५५ धावांनी दणदणीत विजय
तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय म्हणाले जो बायडन?
… म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी पाठवली नोटीस
यापूर्वी ही मेट्रोच्या आरे कार शेडसाठीही अशीच स्थगिती दिली होती. त्यानंतर हा प्रकल्प असाच रखडला आहे. दरम्यान पुण्यात रविवारी उद्घाटन कार्यक्रमांचा जोर असणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते एकाच दिवशी तब्बल २९ ठिकाणी उदघाटन करण्यात येणार आहे. तर, दुसरीकडे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाच ते सहा ठिकाणी उद्घाटन होणार आहे.