माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त उमेदवारांची यादी पाठवली होती. मात्र ही यादी रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पत्र पाठवून केली हाेती. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांची मागणी मंजूर केली असून सदर १२ राज्यपाल नियुक्त उमेदवारांची यादी रद्द केली आहे. या संदर्भात राज्यपालांच्या कार्यालयाकडून मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला पत्र पाठविण्यात आले आहे. राज्यपालांच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांना आणखी एक माेठा धक्का बसला आहे.
विधानपरिषदेतील १२ रिक्त आमदारांच्या जागांसाठी राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी २०२० मध्ये उद्दव ठाकरे यांनी मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवली हाेती. परंतु या यादीला राज्यपालांनी दाेन वर्ष मान्यता दिलेली नव्हती. या राज्यपाल नियुक्त यादीवरून अनेकदा राज्य सरकार अाणि राज्यपाल यांच्यात संघर्षाच्या ठिणग्या उडलेल्या बघायला मिळाल्या हाेत्या. परंतु आता राज्यपालांनी जुनी यादी रद्द केल्याने आता या १२ रिक्त जागी काेणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राज्यात सत्तांतर झालं आहे. त्यामुळे राज्यपाल नियुक्त जागांवर नवीन नावे आपण देणार असल्याचं म्हटलं हाेते. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मविआ सरकारच्या काळातील १२ राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी रद्द करण्यात यावी अशी मागणी करणारं पत्र राज्यपालांना पाठवलेलं हाेते.
हे ही वाचा:
भारतीय अर्थव्यवस्था येत्या सात वर्षात जगात तिसऱ्या क्रमांकावर
अखेर १८६६मध्ये बांधलेला कर्नाक पूल पाडण्यास सुरुवात
बॅनरवरून उद्धव गायब, एकनाथ शिंदेंचा बोलबाला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिफारशीला लगेचच उत्तर देत जुनी यादी राज्यपालांनी रद्द केल्यानं आता नवीन आमदार नियुक्त करण्याचा शिंदे – फडणवीस सरकारचा मार्ग माेकळा झाला आहे. आता या नवीन यादीमध्ये आमदारांच्या संख्येचे पारडं शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये कसे ताेलले जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. लवकरच ही नवीन आमदारांची यादी राज्यपालांकडे पाठवण्यात येणार आहे.