विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी जेंव्हा पदाचा राजीनामा दिला. तेंव्हाच फडणवीसांनी ‘शिडी न लावता फासे पलटवण्याची’ घोषणा केली. संजय राऊत, अजित पवार यांनी काँग्रेसला सुनावण्याची संधी सोडली नाही. आता चर्चा आहे ती राज्यात सत्तापालट होणार की काय? याची. तशी संधी काँग्रेसनेच दिल्याची भीतीही आघाडीच्या नेत्यांकडून ऐकायला मिळतेय. त्यातच आज शाह सिंधुदूर्गात आहेत. त्यामुळे राजकीय चर्चा झडणे स्वाभाविक आहे.
विधानसभेत बहुमताचा आकडा १४५ चा आहे. आघाडीने १६९ आमदारांसह विधानसभेत बहुमत सिद्ध केले आहे. त्यानंतर काँग्रेसकडून नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्षही झाले. आता पुन्हा विधानसभेत अध्यक्षाची निवड होईल त्यावेळेस बहुमताचीही कसोटी लागेल. म्हणजे एका अर्थाने पुन्हा एकदा बहुमत सिद्ध करावे लागेल. आघाडीच्या नेत्यांना जरी विश्वास वाटत असला, तरीसुद्धा निवडीत एक दोनने जरी कमी जास्त झाले, तरी ठाकरे सरकाची प्रतिमा धोक्यात येऊ शकते.
देवेंद्र फडणवीस यांनी ‘शिडी न लावता फासे पलटवू’ असे वक्तव्य केले आहे. त्यानंतर आता अमित शाह महाराष्ट्रात येत आहेत. नारायण राणेंनी तर ‘शाहांच्या पायगुणांनी हे सरकार जावं’ असे खुले संकेत दिले आहेत. त्यामुळे अध्यक्ष निवडताना आघाडीला धक्का देण्याची चांगली संधी आहे असे भाजपाला वाटत आहे.
नाना पटोले यांनी राजीनामा दिला आणि पहिली प्रतिक्रिया उमटली ती सामनाच्या संपादकीय मधून. ‘अध्यक्षपद हे एक वर्षात राजीनामा देण्यासाठी काँग्रेसला दिलेलं नव्हतं’ असा त्यात सूर होता. खुद्द अजित पवारांनीही अप्रत्यक्षपणे राजीनाम्यावर नाराजी व्यक्त केली. शरद पवारांनी सुद्धा काँग्रेसच्या अंतर्गत दबावाच्या राजकारणावर बोट ठेवलं. त्यामुळे एका अर्थाने काँग्रेसने आकड्यांचा खेळ पुन्हा पुन्हा करायला लावू नये असा इशाराच सेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिला आहे.