ठाकरे सरकारची प्रताप सरनाईकांवर कृपादृष्टी

ठाकरे सरकारची प्रताप सरनाईकांवर कृपादृष्टी

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना दिलासा मिळणारा एक मोठा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवार १३ जानेवारी रोजी घेण्यात आला. ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक एक येथे उभारलेल्या ‘छाबय्या विहंग गार्डन’ या गृहसंकुलातील अनधिकृत बांधकामासाठी ठाणे पालिकेने ठोठावलेला दंड आणि त्यावरील व्याज माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे आता सरनाईक यांना पाठवलेली ४ कोटी ३३ लाख ९७ हजारांची नोटीस रद्द होणार असून ही रक्कम आता सरनाईक यांना भरावी लागणार नाही.

एखाद्या प्रकल्पाला अशी सवलत दिल्यास अन्य अनधिकृत बांधकामांसाठी अशीच मागणी होऊ शकते, असा धोक्याचा इशारा वित्त विभागाने दिला होता. मात्र, याकडे दुर्लक्ष करून शिवसेनेकडे असलेल्या नगरविकास विभागाने त्यांच्याच पक्षातील या आमदाराला दिलासा दिला आहे. दंड आणि त्यावरील व्याज माफ केल्याने राज्य शासनावर प्रत्यक्ष बोजा पडणार नाही, या एका मुद्द्यावर मंत्रिमंडळाने प्रताप सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामाला अभय दिले आहे.

आमदार सरनाईक यांनी उभारलेल्या गृहसंकुलातील १३ मजली इमारतींमधील चार मजले अनधिकृत असल्याने ठाणे महानगरपालिकेने त्यांना नोटीस बजावली होती. नियमांचा भंग झालेला नसल्याचा दावा सरनाईक यांनी सरकारकडे केला होता. तर टीडीआर मंजूर करून न घेताच सरनाईक यांनी बांधकाम केल्याने ते अनधिकृत ठरवत तत्कालीन महापालिका आयुक्तांनी हे बांधकाम तोडण्याचे आदेश दिले होते.

कालांतराने हे बांधकाम दंड आकारून नियमित करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. त्यानुसार ३ कोटी ३३ लाख ९६ हजार दंड भरण्यास सांगण्यात आले होते. यापैकी २५ लाख रुपये विकासकाने महापालिकेकडे जमा केले. मात्र, उर्वरित रक्कम भरली नाही. त्याची थकबाकी होऊन तीरक्कम भरण्यासाठी प्रताप सरनाईक यांना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, या निर्णयामुळे ४ कोटी ३३ लाख ९७ हजारांची नोटीस रद्द होऊन सरनाईक यांना दिलासा मिळणार आहे.

हे ही वाचा:

अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाचे सावट

लडाख प्रशासनाने उर्दूबद्दल घेतला हा मोठा निर्णय

मेहता पब्लिकेशन हाऊसचे सुनील मेहता यांचे निधन

फाळणीमुळे विभक्त झालेले भाऊ भेटले ७४ वर्षांनी

आमदार सरनाईक यांच्या गृहसंकुलाला झालेला दंड व त्यावरील व्याज माफ करण्याबाबत नगरविकास विभागाने वित्त विभागाकडे फाईल पाठवली असता वित्त विभागाने अशी सूट देऊ नये, असा स्पष्ट अभिप्राय दिला होता. दंड माफी केल्यास ठाणे महानगरपालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होईल, असेही वित्त विभागाने नमूद केले होते. मात्र, तरीही मंत्रिमंडळाने निर्णय घेत सरनाईक यांना दिलासा दिला आहे.

मंत्रिमंडळाच्या या निर्णयावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘ठाण्यातील विहंग गार्डनचे अनधिकृत बांधकाम करणारे, ११४ सदनिका धारकांची फसवणूक करणारे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे गुन्हे माफ करण्याचा ठाकरे सरकारने निर्णय घेतला असला, तरी महाराष्ट्राला लुटणाऱ्या ठाकरे सरकारला जनता कदापि माफ करणार नाही,’ असा घाणाघात किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.

Exit mobile version