बॉलीवूड निर्माता दिग्दर्शक करण जोहर याच्या सुपर स्प्रेडर ठरलेल्या पार्टीमध्ये ठाकरे सरकारमधील मंत्री सहभागी झाल्याचा आरोप भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला आहे. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत करण जोहरच्या पार्टीवर सवाल उपस्थित केले आहेत. तर महापालिकेने करण जोहर राहत असलेल्या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध करावे अशी मागणी शेलार यांनी केली आहे.
निर्माता दिग्दर्शक करण जोहर याने आयोजित केलेली एक पार्टी सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या पार्टीत अनेक प्रतिष्ठित मंडळी सहभागी झाली असून ही पार्टी कोरोना पसरवणारी ठरली. या पार्टीत एक कोरोन बाधित व्यक्ती सहभागी झाली असून त्यामुळे अभिनेत्री करीना कपूर, अमृता अरोरा तसेच सीमा खान यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. तर आता या पार्टीमध्ये राज्य सरकारमधील कोणी मंत्री सहभागी झाले होते का? असा सवाल भाजपाकडून विचारण्यात आला आहे.
हे ही वाचा:
अनिल परबांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे अर्धशतक!
धनंजय मुंडेंनी लुटला जगमित्र साखर कारखाना
UNESCO च्या संस्कृतिक वारसा यादीत दुर्गा पूजेचा समावेश
गुरुवार, १६ डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत आशिष शेलार यांनी या गोष्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “करण जोहर यांच्या घरी झालेल्या पार्टीत सहभागी झालेल्यांना कोरोना झाल्याच्या बातम्या वाचल्या. या पार्टीला किती लोक होते? त्या सर्वांची टेस्ट झाली होती का?” असे प्रश्न आपण पालिकेला विचारले असल्याचे शेलार यांनी सांगितले. तर या पार्टीत किती लोक सहभागी होते यावरून संशय निर्माण होत असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले आहे.
करण जोहर रहात असलेल्या रिजेन्सी नामक इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज पालिकेने घेतले आहे का? असा सवालही शेलार यांनी पालिकेला विचारला. तर हे सीसीटीव्ही फुटेज घेतले नसल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तरी या पार्टीमध्ये राज्यातील कोणी मंत्री सहभागी होता का? असा सवाल विचारताना इमारतीचे सीसीटीवी फुटेज जाहीर करण्याची मागणी शेलार यांनी केली आहे. या पार्टीत कोणी मंत्री सहभागी झाला असेल तर त्याने पुढे यावे असे आव्हान शेलार यांनी दिले आहे.