कोणाच्याही सल्ल्याशिवाय राज्यपालांना निवेदन सोपवले
मराठा आरक्षणाच्या संदर्भात महाविकास आघाडी सरकार जे काही करत आहे, ते हास्यास्पद आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयासमोर आपली बाजू प्रभावीपणे मांडू शकले नाही. आणि आता कोणत्याही सल्ल्याशिवाय राज्यपालांना निवेदन देऊन आले आहेत. खरंतर हे सरकार मराठा आरक्षणाच्या नावाखाली एप्रिल फुल बनवत आहे. असे मत माजी मंत्री आणि भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केले आहे.
आशिष शेलार यांनी भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. ते म्हणाले की, मंगळवारी मराठा आरक्षण उप-समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि भलेही आरक्षण नंतर मिळाले तरी चालेल, परंतु त्यापूर्वी मराठा समाजाला काही सवलती मिळाल्या पाहिजेत असा पवित्रा घेतला. याच्यापूर्वी याच नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत राज्यपालांची भेट घेतली आणि आरक्षणाची मागणी केली. काँग्रेसच्या या दुटप्पी भूमिकेमुळे प्रश्न निर्माण होतो की, वास्तवात तुम्हाला आरक्षण द्यायचे आहे की नाही. महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव आहे. काँग्रेस द्विधेत आहे आणि या द्विधा विचाराने न्यायालयात घात केला आहे.
हे ही वाचा:
बार मालकांप्रमाणे शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दलही पत्र लिहा
व्यापाऱ्यांचे तब्बल ५० हजार कोटींचे नुकसान, अनलॉक होणार?
दोन दिवसांच्या वेतन कपातीवर पोलीस दलाची नाराजी
राज्याच्या अधिकारातील सवलती तातडीने मराठा समाजाला द्या
आशिष शेलारांनी यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका होती अथवा नव्हती या बाबत शंका उपस्थित केली. कोणत्याही प्रकारचे नियोजन आणि अभ्यास न करता राज्यपालांना निवेधन द्यायला गेले. राज्यपालांना भेटण्यापूर्वी तज्ज्ञांचे मत विचारात घेतले नाही. विरोधकांशी चर्चा केली नाही. याप्रकारे कोणतीही तयारी न करता सरकार राज्यपालांची भेट घेऊन मराठा समाजाला धोका देत आहे. आशिष शेलार यांनी सांगितले की, कृपया मराठा समाजाला एप्रिल फूल बनवू नका.
त्या मंत्रीमंडळात तुमच्या पक्षाचे मंत्रीही होते?
शेलार म्हणाले की, मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात की फडणवीस सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी फुल प्रुफ योजना तयार केली नाही. मंत्रीमंडळाच्या ज्या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रस्ताव पारित झालास त्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री सामिल नव्हते का असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला. यावेळी त्यांनी विचारले की तेव्हा मंत्रीमंडळात तुमच्या पक्षाचे मंत्री नव्हते का? तेव्हा तुम्ही संमती दिली नव्हती का? आणि त्यांना आज तो कायदा मुर्खासारखा वाटतो आहे.
नाना पटोले काँग्रेसचे विनोदवीर अध्यक्ष आहेत
भाजपाचे आमदार शेलार यांनी यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विनोदवीर अध्यक्ष म्हणताना टीका केली, की पटोलेंच्या पत्रकार परिषदेत फक्त मोदी, मोदी आणि मोदी असतात. शेलारांनी सांगितले की जेव्हा आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या बाबत बोलतात, तेव्हा तुम्ही का नाराज होता? खरंतर नाना पटोले एक विनोदवीर आहेत आणि त्यांना गंभीरपणे घेण्याची गरज नाही.