महाविकास आघाडीत पदांवरून ‘मारामारी’

महाविकास आघाडीत पदांवरून ‘मारामारी’

काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये विधानसभा अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्री पदाबाबत चर्चा सुरु असण्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपदावरुन घासाघीस सुरु आहे. त्याचे पडसाद आता महाविकास आघाडी सरकारमध्ये उमटताना दिसत आहेत कारण विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्षपदापेक्षा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद हवं आहे. हे पद मिळाल्यानंतर ते विधानसभा अध्यक्षपद सोडतील अशी चर्चा आहे.

नाना पटोलेच नाही तर काँग्रेसने देखील हे पद आपल्याकडून सोडण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्याबदल्यात काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद हवे आहे. म्हणजेच विधानसभा अध्यक्षपदाच्या बदल्यात उपमुख्यमंत्रिपद पदरी पाडून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्याला शिवसेनेने होकार दर्शवल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. असे झाले तर दोन्ही पक्षांचे एकमत होईल, पण राष्ट्रवादीला काय मिळणार? हा प्रश्न उपस्थित होईल.

दरम्यान, शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष विरुद्ध ध्रुवांवरचे आहेत. यांच्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा दुवा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका यामध्ये महत्त्वाची ठरणार आहे. काँग्रेस आणि शिवसेनेचे जे प्रस्ताव आहेत, ते राष्ट्रवादीला मान्य होतीलच असे नाही. राष्ट्रवादीही एखाद्या पदावर दावा सांगू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्येही आता पदावरून वाद होणार का? असा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे.

Exit mobile version