राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनाही पत्र पाठवले असल्याची माहिती आहे. महाविकास आघाडी सरकारला उद्या, ३० जून रोजी सकाळी ११ वाजता बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता राजकीय वर्तुळात घडामोडी घडताना दिसत आहेत. मंगळवार, २८ जून रोजी रात्री भाजपाचे नेते राज्यपालांना भेटायला गेले होते. सरकारने बहुमत गमावले असल्याचा दावा त्यांनी केला. राज्यपालांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राज्यपालांना एक ई-मेलच्या माध्यमातून बंडखोर आमदारांनी पत्र दिलं आहे. शिवसेनेचे ३९ आमदारांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगावं अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे.”
हे ही वाचा:
तारापूर एमआयडीसी प्लांटमध्ये भीषण आग
सरकारला आली जाग! औरंगाबादचे संभाजीनगर करणार
‘अल्ट न्यूज’चे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर यांना अटक
… आणि जो बायडेन स्वतः पंतप्रधान मोदींना भेटायला आले
शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला. काही आमदारांसह ते सूरतमध्ये दाखल झाले. तिथून ते गुवाहाटी येथे रवाना झाले. त्यानंतर शिवसेनेकडून मन वळवण्याचा प्रयत्न सुरु होता. मात्र, एकनाथ शिंदेंनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं.