शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार आणि अमित शाह यांच्या भेटीबाबत वक्तव्य केले. त्याबरोबरच, पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार जाणार नाही असा दावा देखील केला आहे.
अमित शाह आणि शरद पवार यांची अहमदाबाद येथे भेट झाल्याचे बोलले जात आहे. याविषयी संजय राऊत यांनी, भेट झाली असेल तर बिघडलं कुठे? देशाच्या गृहमंत्र्यांना देशातला एखादा भेटूच शकतो. आम्ही देखील गृहमंत्र्यांना भेटू शकतो. जर काही कामानिमित्त भेट झाली असेल तर त्यात गैर काही नाही असे सांगून राऊत यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला. बंद दारा मागे झालेल्या चर्चा केव्हा ना केव्हा सार्वजनिक होतातच असंही ते म्हणाले.
हे ही वाचा
मुंबईत वाढले आजवरचे सर्वाधिक कोरोना रुग्ण, तर महाराष्ट्राचा आकडा चाळीस हजार पार
बांग्लादेशमध्ये पुन्हा हिंदूंवर अत्याचार
कथित शाह-पवार भेटीने महाविकास आघाडीत खळबळ
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मात्र या सर्व शक्यता फेटाळण्यात आल्या होत्या. अशा प्रकारची कुठलीही भेट झाली नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी सांगितले होते. तर केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत काही गोष्टी सार्वजनिक सांगता येत नाहीत अशी ‘नरो वा कुंजरो वा’ भूमिका घेतली होती.
यावेळी बोलताना संजय राऊत यांनी महाविकास आघाडीची पुन्हा एकदा बाजू घेतली. महाविकास आघाडी सरकार स्थिर असल्याचा दावा त्यांनी केला. त्याबरोबरच महाराष्ट्राला खूप काम करायचे आहे. विरोधी पक्षांनी निष्कारण टीका करण्याचा रंग लावू नये. त्यांनी आमच्यासोबत काम करावे असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.