राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या घोटाळ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या कोल्हापूरला जात आहेत. परंतु आज सकाळी जेंव्हा सोमैय्या यांनी कोल्हापूर दौरा घोषित केला त्यावेळी त्यांच्यावर कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हाबंदी लागू घालण्यात आली होती. आता मात्र सोमय्यांवरील ही जिल्हाबंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांचा कोल्हापुरात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए.
आखीर ठाकरे/पवारांना झुकावे लागले. माझ्यावरील कोल्हापूर जिल्हाबंदी मागे घ्यावी लागली @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/X7ux9wB0MU
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 27, 2021
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी किरीट सोमय्या यांच्यावर लादलेली जिल्हाबंदी उठवण्याचे आदेश दिले आहेत. सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्या विरोधात दोन साखर कारखान्यांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर सोमय्या यांनी कोल्हापुरात जाऊन मुश्रीफांविरोधात तक्रार दाखल करण्याची घोषणा केली होती. मात्र, सोमय्यांना नोटीस बजावत जिल्हाबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना त्यांच्या मुलुंडच्या निवासस्थानी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर रोखण्याचा प्रयत्नही झाला होता. त्यावरुन ठाकरे सरकारला विरोधकांनी झोडपले होते. आता सोमय्या हे मंगळवारी (२८ सप्टेंबर) कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत. हिम्मत असेल तर मला अडवून दाखवा, असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय. या पार्श्वभूमीवर आता सोमय्यांवरील जिल्हाबंदी उठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
“केंद्र सरकारनं ठाकरे सरकार आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी, पोलिसांना नोटीस पाठवली की जर किरीट सोमय्यांची गनिमी काव्यानं हत्या करण्यात येणार होती तर त्याची माहिती आम्हाला का दिली नाही? आणि ते कोण करणार होतं ते शोधून काढावं. मी जिल्हाधिकारी, एसपी आणि ठाकरे सरकारला सोडणार नाही. गेल्यावेळी खोटं बोलून त्यांनी तो प्रतिबंधात्मक आदेश काढला होता. त्यांना उत्तर द्यावंच लागणार. ठाकरे सरकारमध्ये दम नाही किरीट सोमय्यांना थांबवण्याचा. मोदींच्या आदेशाप्रमाणे आम्ही घोटाळामुक्त महाराष्ट्र करुच.” अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्हाबंदी उठवल्यावर दिली आहे.