महाविकास आघाडीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी खंडणी मागणाऱ्या महिलेला तीन लाख रोख रक्कम आणि महागडा मोबाईल दिल्याची माहिती समोर आली आहे. मुंडे यांनी त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून ही रक्कम आणि मोबाईल त्या महिलेपर्यंत कुरियरद्वारे पोहचवले.
धनंजय मुंडे यांना एका परिचित महिलेने बलात्काराची तक्रार करण्याची धमकी देत ५ कोटींची खंडणी मागितली आहे. या प्रकरणी मुंडेंनी मुंबईतील मलबार हिल पोलीस ठाण्यात परिचित महिलेबद्दल खंडणी मागितल्याची तक्रार नोंदवली आहे. प्रकरण लक्षात घेता सध्या या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे.
फेब्रुवारी ते मार्च दरम्यान एका परिचित महिलेने आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन करून खंडणीची मागणी केली. या महिलेने पाच कोटींचे दुकान आणि महागड्या मोबाईलची मागणी मुंडेंकडे केली होती. तसेच खंडणीची मागणी पूर्ण न केल्यास सोशल मीडियावर बदनामी आणि मुंडेंविरुद्ध बलात्काराची तक्रार करण्याची धमकी या सदर महिलेने दिली होती. धमकीनंतर ओळखीच्या व्यक्तीकडून मुंडेंनी कुरियरद्वारे या महिलेला तीन लाख रक्कम व महागडा मोबाईल पाठवला होता. मात्र तरीही ही महिला पाच कोटींच्या ऐवजाची मागणी करत होती, अशी तक्रार धनंजय मुंडेंनी पोलीस ठाण्यात केली आहे.
हे ही वाचा:
कुतुबमिनारजवळच्या मशिदीसाठी उद्ध्वस्त केली होती २७ मंदिरे
दिल्लीत मास्कसक्ती, मास्क न वापरल्यास ५०० रुपये दंड
भाजपाच्या पोल खोलमुळे दहिसरमध्ये शिवसेना बिथरली
मुंडेंच्या या तक्रारीनुसार खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखेकडून तपास सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, खंडणी मागून धनंजय मुंडे यांना धमकावणारी ही महिला कोण? असा सवाल आता उपस्थित केला जातो आहे. मात्र माध्यमांकडून असेही समोर येत आहे की, सदर महिला धनंजय मुंडेंच्या परिचयाची आहे.