विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बीकेसी येथील पोलिस ठाण्यात बोलावून त्यांचा जबाब नोंदविण्यात येणार होता पण भाजपाने आंदोलनाची हाक दिल्यावर मुंबई पोलिसांनी फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन हा जबाब नोंदविण्याचे ठरविले आहे.
नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप फडणवीसांवर ठेवण्यात येत आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना फोन टॅप केल्याचा हा आरोप आहे. या प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यासंदर्भात जबाब नोंदविण्यासाठी देवेंद्र फडणवीसांवर नोटीस बजावण्यात आली आहे. फडणवीसांचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी फडणवीसांना बोलावलं होतं. मात्र भाजपने बीकेसीकडे मोर्चा वळविण्याचे ठरविले होते. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता पोलीस त्यांच्या घरी जाऊनच आता जबाब नोंदवणार आहेत.
हे ही वाचा:
विद्यार्थ्याच्या फी संदर्भात विचारणा केल्यावर पालकाला मारहाण
तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय म्हणाले जो बायडन?
… म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी पाठवली नोटीस
तेजस मोरे यांनी केले स्टिंग ऑपरेशन; प्रवीण चव्हाणांचा आरोप
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी आता पोलिस जातील. सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात मिळालेल्या नोटिशीबद्दल पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आणि आपण पोलिस ठाण्यात जाऊ असेही सांगितले. तेव्हा भाजपाने बीकेसी पोलीस स्टेशनजवळ शक्ती प्रदर्शन करण्याची घोषणा केली. भाजपाची ही तयारी आणि त्यामुळे त्यांना वरचढ होण्याची संधी मिळेल हे हेरून महाविकास आघाडीने मागे पाऊल घेतले आणि फडणवीस यांच्या घरी जाऊनच जबाब नोंदविणार असल्याचे जाहीर केले, असे बोलले जात आहे.
रश्मी शुक्ला यांच्याविरोधात फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई आणि पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालात रश्मी शुक्ला दोषी आढळल्या आहेत. या प्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने रश्मी शुक्ला यांच्यावर २५ मार्चपर्यंत कठोर कारवाई करू नका, अशा सूचना दिल्या आहेत.