भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात मुंबई पोलीस सक्रिय झालेले पाहायला मिळत आहेत. मुंबई येथील ट्रॉम्बे पोलिसांनी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र मुंबई महापालिकेचे नगरसेवक नील सोमय्या यांना समन्स बजावले आहे. शनिवार, ९ एप्रिल रोजी पोलीस स्थानकात हजर राहण्याच्या संदर्भात हेच समन्स बजावण्यात आले आहेत.
किरीट सोमय्या आणि त्यांचे चिरंजीव नील सोमय्या यांना आयएनएस विक्रांत या युद्धनौकेच्या बचावाचे कारण पुढे करत ५७ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यानंतर या संदर्भात सोमय्या यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. मुंबई येथील ट्रॉम्बे पोलीस स्थानकात सोमय्या यांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने आता सोमय्या पिता पुत्रांना समन्स बजावण्यात आले आहे.
हे ही वाचा:
पाच लाख दिव्यांपासून साकारली जाणार प्रभू रामचंद्रांची भव्य कलाकृती
नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलने समर्थनीय नाहीत.
आंदोलकांच्या भितीने अनिल परबांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ
आयएनएस विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यास संदर्भात किरीट सोमय्या यांनी सामान्य जनतेकडून निधी गोळा केला. पण हा निधी राज्यपालांकडे जमा केला नसल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. संजय राऊत यांच्या मालमत्ता जप्त केल्यानंतरच राऊत यांनी अशा प्रकारचे आरोप सोमय्यांवर केला होता. सोमय्या यांनी हे आरोप फेटाळले असून संजय राऊत यांनी यासंदर्भात पुरावे सादर करावेत असे आव्हान दिले आहे.
त्यामुळे आता या प्रकरणात नवी काय होईल हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर सोमय्या यांच्या पोलीस चौकशीतून काही निष्पन्न होणार का? की आजवरच्या इतिहासाप्रमाणे संजय राऊत यांचे आरोप पुन्हा बिनबुडाचे ठरणार हे बघणे महत्वाचे असेल.