मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची ट्विटरवर जीभ घसरली आहे. ट्विटरवर एका नेटकाऱ्याच्या साध्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांचा संयम सुटला आहे आणि थेट त्यांनी त्या तरुणाचा बाप काढला.
ठाकरे सरकारच्या भोंगळ कारभारामुळे महाराष्ट्रात लसीकरणाचा पुरता फज्जा उडालेला असताना ठाकरे सरकारचे नेते सभ्यतेची मर्यादा सोडून नागरिकांना उत्तर देत आहेत. बुधवार, २२ रोजी याची प्रचिती आली मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी चक्क एका नेटकऱ्याचा बाप काढल्याची घटना समोर आली आहे.
हे ही वाचा:
घोषणा सम्राट सरकारमुळे महाराष्ट्रात लसीकरणाचा फज्जा
बारा आमदारांचे प्रकरण विचाराधीन, मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती
अनिल परबांच्या अडचणीत वाढ, दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडरची सर्वत्र चर्चा आहे. या ग्लोबल टेंडरची मुदत आज संपली असून या टेंडरला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. महापालिकेकडे फक्त नऊ निविदा आल्या असून यापैकी एकाची निवड पालिकेला करायची आहे. याचीच बातमी ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीने दिली होती. त्या बातमीची लिंक टीव्ही ९ मराठीच्या अधिकृत ट्विटर खात्यावर शेअर करण्यात आली होती. त्यात महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अधिकृत ट्विटर खात्याला टॅगही करण्यात आले होते. या बातमीवर व्यक्त होताना एका नेटकऱ्याने ‘कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले’ असा साधा प्रश्न विचारला. खरं तर या प्रश्नाची ना भाषा गैर होती, ना रोख चुकीचा होता. पण तरीही या प्रश्नाने महापौर किशोरी पेडणेकर पुरत्या संतापल्या. राग अनावर होऊन किशोरी पेडणेकर यांनी थेट ‘तुझ्या बापाला’ असे प्रत्युत्तर त्या तरुणाला दिले.
किशोरी पेडणेकर यांचा हा अवतार बघून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. किशोरी पेडणेकर यांनी आता आपले ट्विट डिलीट केले आहे. तरीही पेडणेकर यांनी वापरलेल्या भाषेसाठी त्यांच्यावर चौफेर टीका होताना दिसत आहे. तर ‘किशोरी पेडणेकर को गुस्सा क्यू आता है?’ असा सवालही विचारला जात आहे.