महापौर किशोरी पेडणेकर यांना प्रदीर्घ आयुष्य लाभो

महापौर किशोरी पेडणेकर यांना प्रदीर्घ आयुष्य लाभो

मुंबई महापौर किशोरी पेडणेकर या तब्येतीच्या कारणास्तव रूग्णालयात दाखल झाल्या आहेत. अचानक छातीत दुखू लागल्यामुळे किशोरी पेडणेकर या रुग्णालयात दाखल झाल्या. पण ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीने कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता मुंबई महापौर यांचे निधन झाल्याची बातमी दिली. ही बातमी वाचून सार्‍यांनाच धक्का बसला. तर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपण जिवंत असल्याचे जाहीर करत इंडिया टुडे वाहिनीची ट्विटरवरून चांगलीच खरडपट्टी केली आहे.

शनिवारी रात्री महापौर किशोरी पेडणेकर यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना छातीत दुखू लागले. उपचारासाठी त्यांना ग्लोबल रुग्णालयात भरती करण्यात आले. रविवारी सर्वच वृत्तवाहिन्यांनी या संबंधीचे वार्तांकन केले. पण ब्रेकिंग न्यूजच्या नादात पत्रकारितेची सगळी तत्वे धाब्यावर बसवणाऱ्या ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीने थेट महापौर किशोरी पेडणेकर यांच्या निधनाचे वृत्त लिहिले. हे वृत्त पाहून साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. पण स्वतः महापौर किशोरी पेडणेकर यांनीच आपण जिवंत असल्याचे जाहीर करत इंडिया टुडे वाहिनीला खडे बोल सुनावले आहेत.

हे ही वाचा:

महापालिकेच्या पार्किंगमध्ये ४०० गाड्यांना जलसमाधी

भारतात ओटीटी प्लॅटफॉर्मला मोठी लोकप्रियता

वारकऱ्यांसाठी पंढरपूरची एकही एसटी नाही

जय हो! लडाखमध्ये चार नवे विमानतळ आणि ३७ हेलिपॅड

किशोरी पेडणेकर यांनी इंडिया टुडे वाहिनीची बातमी आपल्या ट्विटरवर टाकत, “मी जिवंत आहे आणि ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे” असे सांगितले. तर तुमच्या माहितीसाठी सांगते मी अत्ताच दाल खिचडी खात आहे असा टोला इंडिया टुडे वहिनीला लागावला. मला खात्री आहे तुमच्यासारख्या आघाडीच्या माध्यमाला पत्रकारितेच्या तत्वांची जाण आहे. अशा बातम्या देण्याआधी त्याची खात्री करण्याचे कष्ट घ्या. कमीतकमी एवढी तर अपेक्षा तुमच्याकडून करू शकतो असे खरमरीत ट्विट किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

इंडिया टुडे वाहिनी आणि त्यांचे संपादक राजदीप सरदेसाई यांचा या पद्धतीचा इतिहास राहिलेला आहे. या आधी इंडिया टुडे वाहिनीचे संपादक राजदीप सरदेसाई यांनी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या बाबतही अशाच प्रकारचे ट्विट करत त्यांच्या निधनाची खोटी बातमी दिली होती. त्यावेळीही मुखर्जी यांच्या कुटुंबीयांनी सरदेसाई यांना चांगलेच झापले होते. यावर सरदेसाई यांनी माफी मागितली असली तरीही त्यांच्यात सुधारणा झाली नाही. कारण शेतकरी आंदोलनाच्या बाबतही जेव्हा हिंसाचार घडला तेव्हा पोलिसांनी गोळीबार केल्याचे खोटे वृत्त सरदेसाई यांनी दिले होते. त्यासाठी त्यांच्या वाहिनीने त्यांना ‘ऑफ एअर’ केले होते.

Exit mobile version