वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर आता मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्त म्हणून पदभार सोपवण्यात आला आहे. नगराळे यांच्या जागी रजनीश सेठ हे राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून अतिरिक्त कार्यभार सांभाळतील. परमबीर सिंह यांच्याकडे आता गृहरक्षक दलाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबई मधील ‘अँटिलीया’ या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडल्यानंतर या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. वाझे यांच्या अटकेनंतर त्यांचे निलंबनही केले गेले. याच प्रकरणामुळे आता परमबीर सिंह यांच्यावरही बदलीची नामुष्की ओढवली आहे. अंबानी यांच्या केसमध्ये परमबीर सिंह यांच्या नेतृत्वातील मुंबई पोलिसांच्या तपासावर पहिल्यापासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. अशातच मुंबई पोलिसांच्या सीआययु युनिटमधील अधिकारी सचिन वाझेच या प्रकरणातील मुख्य आरोपी झाले. अंबानी प्रकरणात दिसून आलेली पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडी ही मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात आढळून आली. इतकच नाही तर ही गाडी पोलीस दलाच्या वापरातील होती असे देखील समोर आले. त्यामुळे या प्रकरणात पोलीस दलातील अनागोंदी कारभार समोर आल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांवर बदलीची कारवाई करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
कुबेरगिरी, अर्थात निसटलेल्या लंगोटीची नैतिकता
शरद पवारांचे काँग्रेसला थेट आव्हान, तरीही आघाडीत सर्वकाही आलबेल?
तुम्ही गृहमंत्री होणार का? या प्रश्नावर काय म्हणाले जयंत पाटील?
गेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंह यांच्या बदलीचे संकेत मिळत होते. मंगळवारी रात्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री अनिल देशमुख, पोलीस महासंचालक हेमंत नगराळे, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यात तब्बल पाऊणे चार तास बैठक झाली. त्यांनतर बुधवारी दुपारी परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत याविषयीची माहिती दिली.
सरकारचा मोठा निर्णय
श्री हेमंत नगराळे होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त
श्री रजनीश शेठ यांच्या कडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार
श्री संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी
श्री परमवीर सिंह यांच्या कडे गृह रक्षक दलाची जवाबदारी— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 17, 2021