तृणमूल काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीत आलेले मुकुल रॉय हे आता पुन्हा तृणमूलवासी झाले आहेत. शुक्रवार, ११ जून रोजी रॉय यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचे पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला. मुकुल रॉय यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव शुभ्रांशू रॉय यांनी देखील तृणमूल मध्ये प्रवेश केला आहे.
मार्च आणि एप्रिल महिन्यात पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी विरुद्ध तृणमूल काँग्रेस हा सामना चांगलाच रंगलेला पाहायला मिळाला. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाची सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजपाने जोरदार लढा दिला. या रणधुमाळीत तृणमूल काँग्रेस पक्षाचे अनेक नेते यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. सुरुवातीच्या काळात भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या काही तृणमूल नेत्यांमध्ये मुकुल रॉय यांचा समावेश आहे. रॉय यांनी २०१७ सालीच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. पण आता २०२१ मध्ये भाजपा पराभूत झाल्यानंतर रॉय याणी पुम्हा एकदा तृणमूलचा रस्ता धरला आहे.
हे ही वाचा:
दोन ओंडक्यांची होते सागरात भेट
तीन पक्ष एकत्र येऊन पडलो कसे? या प्रश्नावर चर्चा झाली असावी
भाजपा खासदारावर हल्ला, तृणमूल काँग्रेसवर आरोप
ही तर पवारांनी काँग्रेसला दिलेली धमकी
मुकुल रॉय हे ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानले जातात. रॉय यांच्या पक्ष प्रवेशाच्या वेळीही ही गोष्ट दिसून आली. ममता बॅनर्जी यांनी मुकुल रॉय हे आमच्या घरातील सदस्य आहेत असे सांगत त्यांचे स्वागत केले. तर मुकुल रॉय यांच्यासोबत कोणते मतभेद नसल्याचेही सांगितले. नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मुकुल रॉय हे उत्तर कृष्णानगर या मतदारसंघातून निवडून आले होते. पण आता रॉय यांनी पक्षांतर केल्यामुळे कायद्याप्रमाणे त्यांचे विधिमंडळ सदस्यत्व रद्द होणार आहे. त्यामुळे उत्तर कृष्णानगर मतदारसंघात आता पोटनिवडणूक लागणार आहे.