उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार रितेश पांडे यांनी रविवारी बसपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. बसपमधून राजीनामा दिल्यानंतर काही तासांतच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि भाजप प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र सिंह चौधरी यांच्यासह अनेक नेत्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.रितेश पांडे यांनी राजीनामा दिल्यानंतर बसपवर अनेक गंभीर आरोपही केले.
मागील काही दिवसांपूर्वी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत जेवण करणाऱ्या ९ खासदारांमध्ये रितेश पांडेचाही समावेश होता.खासदार रितेश पांडे यांनी मायावतींना पत्र लिहून पक्षातील आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले.मायावती आणि पक्षाचे आभार देखील त्यांनी मानले.ते म्हणाले की, आपले मार्गदर्शन मिळाले, पक्षाने मला उत्तर प्रदेश विधानसभा आणि लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, पक्षाने मला लोकसभेतील संसदीय पक्षाचा नेता म्हणून काम करण्याची संधीही दिली.
हेही वाचा..
२९ फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित; दिल्लीच्या सीमा अंशतः खुल्या
दोन हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटचा मास्टरमाइंड तामिळ चित्रपट निर्माता
उत्तर प्रदेश: फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ८ जणांचा मृत्यू!
सुलतानने राज नाव धारण करत हिंदू मुलीला फसवले!
बसपावर आरोप
पक्षावर गंभीर आरोप करत खासदार रितेश पांडे म्हणाले की, ‘बऱ्याच दिवसांपासून मला पक्षाच्या बैठकींना बोलावले जात नाही. मी तुमच्याशी आणि उच्च अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा आणि भेटण्याचा अनेक प्रयत्न केला, पण त्यांचा काहीही परिणाम झाला नाही, असे ते म्हणाले.ते पुढे म्हणाले की, अशा परिस्थितीमध्ये मी माझ्या भागातील आणि इतरत्र पक्षाच्या कार्यकर्त्यांना, समर्थकांना भेटत राहिलो.
सध्याची परिस्थिती पाहता यातून एक निष्कर्ष निघतो तो म्हणजे, पक्षाला आता माझ्या सेवेची आणि उपस्थितीची गरज नाही.त्यामुळे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही, असे रितेश पांडे म्हणाले. तसेच पक्षाशी संबंध तोडण्याचा हा निर्णय भावनिकदृष्ट्या कठीण असल्याचे म्हणाले.दरम्यान, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ९ खासदारांसोबत जेवण केले होते.यामध्ये बसपचे खासदार रितेश पांडे यांचाही समावेश होता.