‘आदित्येंच्या वयापेक्षा जास्त वर्ष शिवसेनेत आम्ही काम केलंय’

खासदार प्रतापराव जाधव यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

‘आदित्येंच्या वयापेक्षा जास्त वर्ष शिवसेनेत आम्ही काम केलंय’

युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे हे नेहमी शिंदे गटातील आमदारांवर टीका करत असतात. यादरम्यान, शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव यांनी यावेळी आदित्य ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. आदित्य ठाकरे याचा शिवसेनेशी संबंध कधीपासून आला. शिवसेनेत आदित्य ठाकरेंचं योगदान काय? असे सवाल प्रतापराव जाधवांनी आदित्य ठाकरेंना केले आहेत.

खासदार प्रतापराव जाधव म्हणाले, माझ्यासारख्या व्यक्तीने बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेऊन ३६ वर्षे काम केले. या महाराष्ट्रात शिवसेना आम्ही वाढवली. बाळासाहेबांचे विचार घराघरापर्यंत आम्ही नेले. शिवसेनेच्या शाखा गावागावापर्यंत नेल्या. गाव तेथे शाखा असा उपक्रम राबविला. घर तेथे शिवसैनिक हा बाळासाहेबांचा नारा आम्ही दिला. यातील आदित्य ठाकरेंनी काय केलं? असा सवाल करत ते म्हणाले, आदित्य ठाकरे यांचा शिवसेनेशी संबंध कधीपासून आला? शिवसेनेत आदित्य ठाकरे याचं योगदान काय? आदित्य ठाकरे यांनी एखादी शिवसेनेची शाखा स्थापन केली आहे का? की आंदोलन करत असताना एखादा गुन्हा किंवा पोलीस केस आदित्य ठाकरे विरोधात आहे का? असे सवाल जाधव यांनी आदित्य ठाकरेंना केले.

पुढे ते म्हणाले, उपाशी राहून कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात काम केलं. आदित्य यांचं ३२ ते ३३ वर्षे वय आहे आणि आमचे शिवसेनेतील कर्तृत्व ३६ ते ३७ वर्षांचे आहे. तरीही आदित्य आमच्याशी बोलताना वयाचं भान ठेवत नाहीत.

शिवसेना भाजपाच्या युतीतून आदित्य ठाकरे आमदार झाले आहेत. उद्धव ठाकरे यांची, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अशी घोषणा होती. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या कुटुंबातील आदित्यांना पुढे आणलं, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. आदित्य यांना निवडून देण्यासाठी दोन जणांना विधानपरिषदेचे आमदार करावे लागले. त्यामुळे युतीमध्ये निवडणून आलेल्या आदित्य यांनी पहिला आमदारकीचा राजीनामा द्यावा मग पुढे लोकांना सांगत फिरावं, असा सल्ला प्रतापराव जाधव यांनी दिला आहे.

हे ही वाचा :

आसाममध्ये होणार महाराष्ट्र भवन, मुख्यमंत्र्यांची घोषणा

पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या मुलीचा कुचिपुडी डान्स व्हायरल

पंतप्रधान मोदींना धमकी देणाऱ्याला गुजरातमधून अटक

फडणवीस उद्धव ठाकरेंना म्हणाले, काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही …!

खोक्यांविषयी बोलताना प्रतापराव म्हणाले, खोक्यांचा विषय असेल, तर त्याला कुठलाही आधार नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० खोक्यांचे आरोप केले गेले. त्या माध्यमातून सचिन वाझे, अनिल देशमुख हे तुरुंगात गेले. ते खोके सरकारच्या ज्येष्ठ नेत्यांपर्यंत जात होते का, याचा तपास करण्याची गरज असल्याचंही प्रतापराव जाधव यांनी सांगितलं आहे.

Exit mobile version