राजधानी दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलेच तापले आहे. गेले दोन दिवस राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधकांनी चांगलीच फटकेबाजी केली असून यात काही भाषणे खूपच लक्षवेधी ठरली आहेत. भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य सिंदिया यांनी शरद पवारांचा पर्दाफाश केला आहे तर भाजपाचेच दुसरे खासदार डॉ.विनय सहस्रबुद्धे यांनी संजय राऊतांची धुलाई केली आहे.
ज्योतिरादित्य सिंदिया राज्यसभेत नव्या कृषी सुधारणांच्या अनुषंगाने बोलत होते. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांनी २०१०-२०११ साली देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला. त्यावेळी पवार यांनी कृषी सुधारणांची गरज बोलून दाखवली होती. पण आता त्यांनी आपले शब्द फिरवले आहेत. “ही शब्द फिरवायची सवय बदलणे गरजेचे आहे.” असे म्हणत सिंदियांनी शरद पवारांवर हल्ला चढवला आहे.
“आम्ही इतके वर्ष निंदका सोबतच…” – डॉ.विनय सहस्रबुद्धे
शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी राज्यसभेत भाषण करताना संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा उल्लेख केला. ” संत तुकाराम महाराजांच्या अभंगात ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असे म्हटले आहे” असे राऊत आपल्या भाषणात म्हणाले होते. विनय सहस्रबुद्धेंनी याच मुद्द्यावरून राऊतांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. “१५ वर्ष आम्ही निंदकालाच सोबत ठेवले होते. तुम्ही प्रेम एकावर केलंत आणि संसार मात्र दुसऱ्यासोबत थाटलात. तुम्हाला आत्मपरीक्षणाची गरज आहे.” असे म्हणत खासदार विनय सहस्रबुद्धेंनी संजय राऊतांना चांगलेच सुनावले आहे.