एमआयएम पक्षाचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा महाविकास आघाडीसोबत युती करण्याची तयारी दाखवली आहे. तसेच त्यांनी काँग्रेस पक्षाला टोला देखील लगावला आहे. राज्यात काँग्रेसपेक्षा एमआयएम मोठा पक्ष असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी लोकसभा निवडणुकीत आमच्या सोबत आघाडीचा विचार करावा, असा प्रस्ताव समोर ठेवला आहे.
इम्तियाज जलील म्हणाले, “महाराष्ट्रात गेल्यावर्षी आमचा एक खासदार होता आणि काँग्रेसचा देखील एकच खासदार होते. आता काँग्रेसचा एकही खासदार महाराष्ट्रात नाही. राज्यात काँग्रेसपेक्षा एमआयएम मोठा पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी लोकसभा निवडणुकीत आमच्यासोबत आघाडीचा विचार करावा. आम्ही युतीसाठी खूप प्रयत्न केले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी आता आमच्यात युती होणार नसल्याचे अनेकदा सांगितले आहेत. त्यामुळे आम्ही आता त्यांच्याकडे पुन्हा जाणार नाही,” अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
“आमच्यावर भाजपाची बी टीम म्हणून आरोप होत असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना युतीची ऑफर आम्ही दिली होती. त्यामुळे त्यांची अडचण झाली होती. त्यांच्यासाठी ही ऑफर अजूनही कायम आहे. भाजपा विरोधात एकत्र येण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला युती करण्यासाठी अजूनही ऑफर आहे. त्यांनी यासाठी विचार करावा. महाविकास आघाडीची युती कशी आहे त्यावर तिन्ही पक्षांनी विचार करावा. तसेच एमआयएमला सोबत घ्यायचं की नाही यावर त्यांनी निर्णय घ्यावा. तसेच महाविकास आघाडीने एमआयएमला सोबत घेण्याचा निर्णय घेतल्यास त्यावर नक्की विचार करू,” असं इम्तियाज जलील म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू महिला लढवणार निवडणूक
हैदराबादचा क्रिकेटपटू झाला आयपीएस अधिकारी
इस्रायलने टिपला सिरीयात इराणचा अधिकारी
अंजू जॉर्ज म्हणते, तो काळ चुकीचा, मोदींच्या काळात खेळांची प्रगती!
एमआयएमच्या या ऑफरनंतर ठाकरे गटाच्या भूमिकेकडे लक्ष लागलेले असणार आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या हिंदुत्ववादावर प्रश्न उपस्थित केले जात असून टीकाही करण्यात येत आहे.