मध्य प्रदेशचे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविडच्या नव्या व्हेरीअंटला इंडियन व्हेरीअंट म्हटल्यामुळे कमलनाथ यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरूनच हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतात एकीकडे कोविडचा हाहाकार सुरू असताना, या विषयावरून तेवढेच जास्त राजकारण तापलेले दिसत आहे. काही दिवसापूर्वी मध्यप्रदेशचे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा एक व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. या व्हिडिओत कमलनाथ कोविडच्या नव्या व्हेरीअंटला इंडियन व्हेरीअंट म्हणताना दिसत आहेत. त्यासोबतच ‘आग लगा दो’ असे आक्षेपार्ह विधान ते करताना दिसत आहेत. या व्हिडिओवरूनच कमलनाथ यांच्यावर चौफेर टीका होत आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही या व्हिडिओवरून कमलनाथ यांच्यावर टीका केली असून मध्यप्रदेश भाजपाकडून कमलनाथ यांच्या विरोधात पोलीस तक्रार करण्यात आली. भोपाल क्राईम ब्रांचसोबत भाजपाकडून ही तक्रार करण्यात आली. या तक्रारीवरून आता कमलनाथ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे.
कोविडच्या कोणत्याही नव्या व्हेरीअंटला एखद्या देशाचे किंवा जागेचे नाव देण्यात येऊ नये असे डब्ल्यूएचओ कडून स्पष्ट सांगितले असतानाही काँग्रेसकडून नेत्यांकडून अनेकदा ‘इंडियन व्हेरीअंट’ असा उल्लेख केल्याचे आढळत आहे. काँग्रेसवर जे टूलकिट बनविण्याचा आरोप होत आहे त्या टूलकिटमध्येही इंडियन व्हेरीअंट असा उल्लेख सातत्याने करण्यात यावा असे सांगितले आहे. त्यातच आता काँग्रेस नेते कमलनाथ यांच्यावर इंडियन व्हेरीअंट असा उल्लेख केल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे या विषयावरून पुन्हा एकदा टूलकिटचा मुद्दा चर्चेत येऊन राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.