राजधानी दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या संसदीय पक्षाची बैठक सुरू असून या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर भाष्य केले आहे. भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, काश्मीर फाइल्ससारखे चित्रपट बनत राहिले पाहिजेत. अशा चित्रपटांमधून सत्य समोर येते. जे सत्य अनेक दिवसांपासून लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे ते समोर आणले जात आहे. त्यामुळेच ज्यांनी सत्य लपवण्याचा प्रयत्न केला ते आज आंदोलन करत आहेत, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
घराणेशाही हा लोकशाहीला धोका आहे, त्याविरोधात लढावे लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत सांगितले. ‘परिवारवादाच्या विरोधात आपण इतर पक्षांविरुद्ध आवाज उठवत असाल तर या गोष्टीचा विचार आपल्या पक्षात करायला हवा,’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत नरेंद्र मोदींनी जामनगरच्या राजाचाही उल्लेख केला. युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या तणावाच्या चर्चेदरम्यान, नरेंद्र मोदी म्हणाले की, जामनगरच्या राजाने दुसऱ्या महायुद्धात पोलंडच्या लोकांना आश्रय दिला होता, त्याचा परिणाम म्हणून पोलंडने युक्रेनमधील आमच्या विद्यार्थ्यांना मदत केली.
हे ही वाचा:
डेरवण युथ गेम्स : ‘अपयशातूनच होते यशाची निर्मिती’
पर्यावरणासाठी उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘विवेकानंद सस्टेनेबिलिटी पुरस्कार’
चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालणारा ‘द काश्मीर फाइल्स’ लवकरच या ओटीटी प्लॅटफॉर्मवर
डहाणू महोत्सवाने दिला स्थानिकांना आर्थिक हातभार
संसदीय पक्षाच्या बैठकीत भारतरत्न लता मंगेशकर, कर्नाटकातील बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्ष, युक्रेनमध्ये ठार झालेला भारतीय विद्यार्थी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या संसदीय पक्षाची शेवटची बैठक २१ डिसेंबर रोजी झाली होती, ज्यामध्ये पंतप्रधान मोदी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी संसदेत खासदारांच्या अनुपस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत त्यांनी स्वतःला बदलावे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, असा इशारा दिला होता.