कॉमेडियन कुणाल कामरा याने गाण्याचे विडंबन करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. याचे पडसाद विधानसभेत उमटले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावरून कुणाल कामरा याला इशारा देत त्याने माफी मागावी अशी मागणी केली होती. कुणाल कामरा याच्या टीकेचे समर्थन विरोधकांनी केले होते. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी कामरा याने म्हटलेलं गाणं पुन्हा एकदा म्हटल्याचा व्हिडीओ समोर आला होता. यामुळे उपमुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.
कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत कविता केली. तीच कविता पुन्हा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी बोलून दाखवली. त्यानंतर, त्यांनी एक कविता केली. त्या कवितेच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका करण्यात आली. सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर बोलताना उपमुख्यमंत्र्यांबाबत चुकीची भाषा वापरली आहे. त्यामुळे, सुषमा अंधारे यांनी दोन्ही सभागृहाचा अवमान आणि अपमान केला आहे. अंधारे यांची खालच्या पातळीवरील भाषा आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबत कामरा यांनी केलेली खालच्या पातळीवरील टीका, यामुळे या दोघांविरोधात मी सभागृहात हक्कभंग प्रस्ताव मांडत आहे, असे म्हणत आमदार प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषद सभागृहात कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध हक्कभंग आणला आहे. कुणाल कामरा याचे गाणे पुन्हा सुषमा अंधारे यांनी म्हटले. मुख्यमंत्री यांनी निवेदन केले असतानाही परत ते गाणे म्हटले आहे, हा सभागृहाचा अपमान आहे. म्हणून, आपण सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध हक्कभंग आणत आहोत, असे आमदार रमेश बोरनारे यांनी विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव आणताना म्हटले.
हे ही वाचा..
“युद्ध थांबवा!” म्हणत उत्तर गाझामध्ये पॅलेस्टिनी नागरिकांची हमास विरोधात निदर्शने
तुंगनाथ मंदिर मार्गावर जखमी युवकाचा यशस्वी बचाव केला
युवा लेखकांना मिळणार संधी; PM YUVA 3.0 कार्यक्रमाची घोषणा
मुंबईत मराठी न बोलल्याने दिला चोप
कुणाल कामराचा टीकात्मक व्हिडीओ समोर येताच शिवसैनिक संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. तर, काही शिवसैनिकांनी कुणाल याने ज्या स्टुडिओमध्ये गाणं गायलं तो स्टुडिओ फोडल्याचं दिसून आलं. तसेच, कामराविरुद्ध मुंबईतील काही पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. चौकशीसाठी कुणाल याला समन्सही बजावण्यात आले होते मात्र तो हजर राहिला नाही.