वाढती कोविड-19 प्रकरणे आणि ओमिक्रॉन प्रकारावरील वाढती चिंता लक्षात घेता, राज्यसभा सचिवालयाने कर्मचार्यांची उपस्थिती मर्यादित केली आहे. मात्र, तरीही संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी खबरदारी म्हणून केलेल्या कोविड चाचणीत चारशेहून अधिक संसद कर्मचारी सदस्यांचा कोविड-19 चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
एका अधिकाऱ्याने एएनआय दिलेल्या माहितीनुसार , ४ ते ८ जानेवारी दरम्यान संसदेच्या १४०९ कर्मचार्यांपैकी जवळपास ४०२ कर्मचारी कोविड-19 साठी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये २०० लोकसभा सदस्य, ६९ राज्यसभेतील सदस्य आणि १३३ सहयोगी कर्मचाऱ्यांना लागण झाली आहे. हे सर्व रिपोर्ट ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पुष्टीकरणासाठी पुढे पाठवण्यात आले आहेत. संसदेने या सर्व कर्मचार्यांना सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
राज्यसभा सचिवालय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर निर्बंध
नवीन निर्देशांनुसार,सचिव आणि कार्यकारी अधिकारी या पदावरील ५० टक्के अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या महिन्याच्या अखेरीपर्यंत घरून काम करण्यास सांगण्यात आले आहे. त्याशिवाय, अपंग आणि गर्भवती महिलांना कार्यालयात येण्यापासून सूट देण्यात आली आहे. राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे आणि या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सचिवालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
गेल्या २४ तासात भारतात एक लाख ५९ हजार ६३२ नवीन कोविड-19 रुग्णांची तर ३२७ मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच, देशातील ओमिक्रॉनची संख्या तीन हजार ६२३ वर पोहोचली आहे. तामिळनाडू, दिल्ली, महाराष्ट्र आणि बंगालसह अनेक राज्यांनी संसर्गाचा प्रसार कमी करण्यासाठी रोज रात्री आणि शनिवार व रविवार कर्फ्यू लागू केला आहे.