“सरकारी योजनांच्या तीन लाखांहून अधिक लाभार्थींना ‘लखपती’ बनण्याची संधी मिळाली आहे. आता त्यांच्या विरोधकांना विरोध करण्याची अधिक कारणे मिळतील.” असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना टोला लगावला. पंतप्रधानांनी डिजिटल पद्धतीने प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या हाती चाव्या दिल्या. त्यानंतर ते बोलत होते.
प्रधानमंत्री आवास योजना-(शहरी)च्या चाव्या त्यांनी डिजिटल पद्धतीने ७५ हजार लाभार्थ्यांना सुपूर्द केल्या. एकप्रकारे भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ७५ हजार जणांना या नव्या घराच्या चाव्या देऊन अमृतमहोत्सवच साजरा झाला. या कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की, “पूर्वीच्या राजवटीत शहरी नियोजन हे कायमच राजकारणाचे बळी होते. १८ हजार घरांना मंजुरी मिळाली तर १८ घरेही बांधली जायची नाहीत.”
“पूर्वीच्या सरकारांना गरिबांसाठी घरे बांधण्याची इच्छा नव्हती. ते घरे बांधण्यात अडथळे निर्माण करत होते. योगी आदित्यनाथ सरकारने आतापर्यंत नऊ लाख घरे दिली आहेत आणि आणखी १४ लाख घरे बांधून पूर्ण होण्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांत आहेत.” असंही मोदी म्हणाले.
७५ जिल्ह्यांतील लाभार्थ्यांना आज नवीन घरांच्या चाव्या मिळाल्या आहेत. केंद्र सरकारच्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ मोहिमेचा एक भाग म्हणून उत्तर प्रदेशच्या नगरविकास विभागाने आयोजित केलेल्या तीन दिवसीय शहरी ‘कॉन्क्लेव्ह’ कार्यक्रमात भाग घेण्यासाठी मोदी लखनउमध्ये होते.
आदल्या दिवशी आदित्यनाथ, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या उपस्थितीत त्यांनी ‘आजादी@७५-न्यू अर्बन इंडिया: ट्रान्सफॉर्मिंग अर्बन लँडस्केप’ कॉन्फरन्स/एक्सपो’चे उद्घाटन केले.
हे ही वाचा:
राज्याच्या गृहखात्यावर कशाचा ‘अंमल’ आहे?
शाळेत जाणाऱ्या शिक्षकांनाच झाली शिक्षा!
ईडीसमोर हजर राहण्यासाठी भावना गवळींना हवे अजून १५ दिवस!
मुंबई पालिका म्हणतेय, छट्, तिसरी लाट वगैरे काही येणार नाही!
“जेव्हा मी लखनउला येतो, तेव्हा मला अवध प्रदेशातील गोड भाषा ऐकू येते. या प्रदर्शनात देशाच्या ७५ वर्षांची कामगिरी दिसून येते. मी सर्व नागरिकांना या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन करतो.” असे पंतप्रधान म्हणाले.