आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. सोमवार १९ जुलै ते १३ ऑगस्ट या कालावधीत वीस दिवस अधिवेशन सुरू राहणार आहे. त्यामुळे यावेळी अधिवेशनात काय नवे घडणार याकडे सध्या देशाचे लक्ष लागले आहे.
मंत्रिमंडळाच्या कामकाज समितीने १९ जुलै ते १३ ऑगस्ट दरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन घेण्यात यावे अशी शिफारस केली होती. त्याला हिरवा कंदील दाखवण्यात आल्यामुळे या ठरलेल्या तारखांनाच संसदेचे अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनात कोरोना संबंधित सर्व नियमावलीचे काटेकोर पालन होणार आहे. खासदारांपैकी बहुतांश सर्वांचेच कोविड लसीचे दोन डोस पूर्ण झाले असल्यामुळे अधिवेशनाचे आयोजन शक्य झाले आहे. पण तरीही संसदेत आवारात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचा लसीचा किमान एक डोस पूर्ण असणे अनिवार्य आहे. तर संसदेतही सुरक्षित अंतर पळून बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
महापालिकेच्या पार्किंगमध्ये ४०० गाड्यांना जलसमाधी
महापौर किशोरी पेडणेकर यांना प्रदीर्घ आयुष्य लाभो
वारकऱ्यांसाठी पंढरपूरची एकही एसटी नाही
जय हो! लडाखमध्ये चार नवे विमानतळ आणि ३७ हेलिपॅड
या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवार १८ जुलै रोजी सरकार तर्फे सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. सकाळी ११ वाजता ही बैठक पार पडली. पण तरी अधिवेशन काळात विरोधी पक्ष नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. अधिवेशनाचे कामकाज चालू देणार की कुठल्यातरी मुद्द्यावरुन गोंधळ घालत अधिवेशन बंद पाडण्याचा प्रयत्न केला जाणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
कोविड महामारी, राष्ट्रीय सुरक्षा, कृषि, अर्थकारण अशा विविध मुद्द्यांवरून हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. मोदी सरकारने नवे सहकार मंत्रालय स्थापन केल्यामुळे हा देखील अधिवेशनातील महत्वाचा चर्चेचा विषय ठरणार आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोविड महामारीच्या विषयावर संसदेला संबोधित करणार असल्याची माहिती मिळत आहे. तर आजवरचा मोदी सरकारचा इतिहास बघता यावेळीही कोणता महत्त्वाचा कायदा पावसाळी अधिवेशनात पारित करण्यासाठी मांडला जातो का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.