भाजपचे माजी सरचिटणीस मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक कल्याण मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांना बिनबुडाचे असल्याचे सांगून नवाब मलिक यांच्याविरोधात १०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. मलिक राजकारणात येण्यापूर्वी भंगारचा व्यवसाय करायचे, असे म्हणत त्याने मलिकना ‘कचरा सेठ’ची उपमाही दिली आहे.
मंत्री मलिक यांनी शनिवारी आरोप केला की, मोहित यांचे मेहुणे ऋषभ सचदेव देखील क्रूझ ड्रग्स पार्टीमध्ये होते परंतु, एनसीबीने त्यांना सोडून दिले. आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना मोहित म्हणाले की, ‘ऋषभ सचदेव माझा मेहुणा आहे आणि त्या दिवशी क्रूझवर गेलेल्या शेकडो प्रवाशांपैकी तो एक होता. त्याचा आर्यन खानशी काहीही संबंध नाही. एनसीबीच्या छाप्यादरम्यान, ऋषभ सचदेवलाही अनेक लोकांसह एनसीबी कार्यालयात आणण्यात आले. चौकशीनंतर त्याला इतरांसह सोडण्यात आले.’
हे ही वाचा:
आर्यनच्या अटकेनंतर बायजूने शाहरुखच्या जाहिराती बंद केल्या?
‘बेस्ट’चे चालक आता भाड्याने मिळणार!
खो- खोपटू सारिका काळेने आपल्यावरील चित्रपटाचे मानधन खेळाडूंसाठी का दिले?
‘चिपी विमानतळाला विरोध कुणी केला हे लोक जाणतात’
मोहित यांनी सांगितले की, मलिक हे नेहमीच बिनबुडाचे आरोप करण्यासाठी ओळखले जातात. काही वर्षांपूर्वी जुहूमधील एका बांधकाम व्यावसायिकाकडे तक्रार मागे घेण्यासाठी मलिक यांच्या कुटुंबीयातील काही लोकांनी ५० लाख रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणात मी हस्तक्षेप केला होता आणि स्वतः मलिकना भेटलो होतो. तेव्हापासून मलिक माझ्याबरोबर वाकड्यात आहे.
मोहित म्हणाले की, ‘मी २०१९ मध्ये मुंबई भाजपचा सरचिटणीस होतो पण, गेल्या काही काळापासून भाजपमध्ये सक्रिय नाही. मी भाजप समर्थक आहे हे खरे आहे पण, माझ्यावरून भाजपला लक्ष्य करणे चुकीचे आहे. मलिक आपल्या पदाचा गैरवापर करत आहेत. मी आणि माझे कुटुंब कोणत्याही तपासाला सामोरे जाण्यास तयार आहोत.’ ते म्हणाले की, माझे मेहुणे ऋषभ सचदेव आणि माझे कॉल रेकॉर्ड तपासले पाहिजेत. एका प्रश्नाला उत्तर देताना मोहित म्हणाले की, माझ्या मेहुण्याला एनसीबी कार्यालयात नेल्याची माहिती मिळाल्यानंतर माझे सासरे एनसीबी कार्यालयात गेले होते. अशा काळात कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे स्वाभाविक आहे.
मंत्री मलिक दोन दिवसांपासून प्रसारमाध्यमांसमोर दावा करत होते की, ते शनिवारी भाजपच्या एका मोठ्या नेत्याबद्दल खुलासा करतील. पण शनिवारी त्यांचा आरोप खोटा असल्याचे सिद्ध झाले. भाजप नेते मोहित कंबोज यांचे मेहुणे ऋषभ सचदेव यांच्याविषयी त्यांनी केलेला खुलासा निराधार असल्याचे सिद्ध झाले. एनसीबीने हे स्पष्ट केले आहे की, ११ लोकांना क्रूझमधून पकडण्यात आले होते, परंतु तपासानंतर अनेक लोकांना निर्दोष ठरवून सोडण्यात आले, ऋषभ सचदेव देखील त्यापैकी एक होते.