मध्य प्रदेशात भाजपाचे धक्कातंत्र; शिवराजसिंह चौहानांऐवजी मोहन यादवांची मुख्यमंत्रीपदी वर्णी

राज्यात दोन उपमुख्यमंत्री

मध्य प्रदेशात भाजपाचे धक्कातंत्र; शिवराजसिंह चौहानांऐवजी मोहन यादवांची मुख्यमंत्रीपदी वर्णी

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले. हा निकाल जाहीर होऊनही मुख्यमंत्री पदी कोण बसणार याचे उत्तर अद्याप जनतेला मिळाले नव्हते. मात्र, सोमवार, ११ डिसेंबर रोजी भाजपाने अखेर मुख्यमंत्रिपदाचा तिढा सोडवला आहे. धक्कातंत्राचा अवलंब करत भाजपाने शिवराजसिंह चौहान यांच्याऐवजी नवा चेहरा मुख्यमंत्रिपदी दिला आहे. मोहन यादव हे आता मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत.

शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात मोहन यादव यांनी काम केलं आहे. शिवाय मोहन यादव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे मानले जातात. भाजपाकडून विधीमंडळ गटनेता ठरवण्यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवराजसिंह चौहान यांनीच मोहन यादव यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावाला भाजपा  आमदारांनी अनुमोदन दिल्याने, मोहन यादव हे मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री असतील यावर शिक्कामोर्तब झालं.

मोहन यादव हे उज्जैन दक्षिणमधून तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. २०२० ते २०२३ या दरम्यान मोहन यादव यांनी शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिले आहे.

दरम्यान, मोहन यादव यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित झालं असताना, मध्य प्रदेशात दोन उपमुख्यमंत्री करण्याचं भाजपाने ठरवलं आहे. त्यानुसार राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवडा हे उपमुख्यमंत्री असतील. तर केंद्रात कृषीमंत्री असलेले नरेंद्रसिंह तोमर हे मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष असतील.

हे ही वाचा:

कलम-३७० हटवण्याचा निर्णय योग्यच!

अंतराळ शक्ती बनण्यासाठी भारतीय हवाई दलाने कंबर कसली!

ट्रक चालक आता अनुभवणार ठंडा ठंडा कूल कूल

आपण देशासाठी काय देऊ शकतो ही भावना प्रत्येकाने जोपासावी

मोहन यादव हे मध्य प्रदेशातील भाजपाचा मोठा ओबीसी चेहरा असून २०२४ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने त्यांच्या नावाची घोषणा केल्याची चर्चा आहे. मोहन यादव यांची शैक्षणिक पात्रता पीएचडी असून २०२० मध्ये त्यांना शिक्षण मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

Exit mobile version