आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून सध्या जागा वाटपाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर सर्वच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे. भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असून विरोधकांच्या ‘इंडी’ आघाडीत अद्याप जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. अशात लवकरच भाजपाची उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपा भारतीय संघाच्या एका स्टार क्रिकेटपटूला निवडणुकीच्या रिंगणात उतरवत असल्याची चर्चा आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकामध्ये भाजपाने ‘अब की पार ४०० पार’चा नारा दिला आहे. अशातच भाजपा भारतीय संघाच्या एका स्टार खेळाडूला लोकसभा निवडणुकीसाठी उतरवणार असल्याची चर्चा आहे. ज्या खेळाडूचे नाव चर्चेत आहे तो खेळाडू म्हणजे मोहम्मद शमी. मोहम्मद शमी हा भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कपमध्ये शमी याने चमकदार कामगिरी करत संघात मोलाची भूमिका बजावली होती.
मोहम्मद शमी हा मुळचा उत्तर प्रदेशमधील असून त्याचा जन्मही तिथेच झाला होता. मात्र, शमी याने रणजी क्रिकेट हे बंगालकडून खेळले होते. रणजी ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळताना शमीला वेगवान गोलंदाज म्हणून राष्ट्रीय ख्याती मिळाली. अजूनही तो बंगालसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधून शमी याला भाजपा तिकीट देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.
हे ही वाचा :
रोहतकची जागा अभिनेता रणदीप हुड्डाला?
उत्तर प्रदेशात सपाला आणखी एक धक्का बसणार!
रशियाच्या मिसाईलपासून झेलेन्स्की थोडक्यात बचावले
दरम्यान, भाजपा शमीला बसीरहाट लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. शमीसोबत भाजपाच्या वरिष्ठांनी याबाबत चर्चा केली होती. यावर शमी काय निर्णय घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शमीला निवडणुकीच्या मैदानात उतरवल्याने बंगालमधील अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात विजय मिळवण्यात पक्षाला मदत होऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.