एनडीएच्या घटक पक्षांच्या खासदारांचे १० गट करून पंतप्रधान करणार चर्चा

बैठकांची सुरुवात २५ जुलैपासून होईल.

एनडीएच्या घटक पक्षांच्या खासदारांचे १० गट करून पंतप्रधान करणार चर्चा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांच्या वेगवेगळ्या गटांशी चर्चा करणार आहेत. साधारणपणे पंतप्रधान प्रत्येक सत्रात वेगवेगळ्या राज्यांतील खासदारांच्या गटांची नियमित बैठक घेतात. मात्र यावेळी दोन्ही सभागृहांतील एनडीएच्या खासदारांचे दहा गट केले जाणार आहेत. बैठकांची सुरुवात २५ जुलैपासून होईल. मंगळवारी झालेल्या एनडीएच्या बैठकीनंतर याबाबत निर्णय घेण्यात आला.

 

खासदारांच्या वेगवेगळ्या गटांची बैठक घेऊन आगामी निवडणुकीच्या दृष्टीने राज्यात भेडसावणाऱ्या आव्हानांवर चर्चा केली जाणार आहे. या प्रत्येक गटात प्रत्येकी २५ ते ४० खासदारांचा सहभाग असेल. एनडीएत चांगला समन्वय साधला जावा, यासाठी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा हे एनडीएतील विविध घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करतील. ज्या राज्यांत पक्ष सत्तेत आहे, तेथील सहकारी पक्षांना भेडसावणारी समस्या आणि ज्या राज्यांत पक्ष सत्तेवर नाही, तेथील आव्हाने यांबाबत या बैठकांमध्ये चर्चा केली जाईल.

हे ही वाचा:

इर्शाळवाडीमध्ये बचावकार्याला सुरुवात; ५० ते ६० जण अजूनही ढिगाऱ्याखाली

श्रीराम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम जवळपास पूर्ण

एसटी बस अपघातांचे प्रमाण शून्यावर आणणार!

शांतता राखा… मणिपूरमधील वेदनादायी घटनांनंतर आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ जुलैपासून दररोज दोन राज्यांतील खासदारांसोबत बैठक घेतील. यामध्ये पहिला क्रमांक उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचा असेल. त्यानंतर कदाचित राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीतील खासदारांशी चर्चा केली जाईल. या बैठकीत पंतप्रधान सद्य परिस्थितीचाही आढावा घेतील. तसेच, त्यांना भेडसावणाऱ्या आव्हानांचाही आढावा घेतील. या बैठकीत भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा हेदेखील सहभागी होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version