संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत सरकार त्यांचा वैधानिक अजेंडा सर्व पक्षांसमोर मांडणार आहे.
संसदेचे कोणतेही अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सर्व पक्षीय बैठक घेण्याची परंपरा आहे. यामुळे संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालवण्यास मदत होते. परंतू या वेळेस ही बैठक संसदेचे कामकाज २९ जानेवरी रोजी सुरू झाल्यानंतर एक दिवसाने ३० जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे.
सर्वपक्षीय बैठक ३० जानेवारी रोजी होणार असून, या बैठकीत सरकार आपला वैधानिक कार्यक्रम सर्व पक्षांपुढे ठेवणार आहे. यावेळेस विरोधी पक्षांकडून केल्या जाणाऱ्या सुचनांचादेखील सरकार विचार करणार आहे, असे जोशी यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.
संसदेचे अर्थसंकल्पिय अधिवेशन २९ जानेवारीपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन दोन टप्प्यांत चालणार आहे.
यातील पहिल्या भागाची १५ फेब्रुवारी रोजी सांगता होईल, तर दुसरा टप्पा ८ मार्च ते ८ एप्रिल या दरम्यान चालणार आहे.
संसदेचे अधिवेशन सकाळच्या दोन पाळ्यांत राज्यसभेत आणि संध्याकाळी लोकसभेत होईल.
महामारीच्या काळात संसदेचे अधिवेशन भरवण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली, उच्च स्तरिय सरकारी अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.