देशभरातील विविध राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा संवाद साधला जाणार आहे. या दरम्यान मोदी कोविड-१९ महामारीची सध्याची देशातील परिस्थिती आणि करायचा उपाययोजनांबद्दल बोलणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
यावेळी नरेंद्र मोदी देशात चालू असलेल्या लसीकरण मोहिमेवर देखील बोलणार असल्याची माहिती प्राप्त होत आहे. उपलब्ध माहितीनुसार ही आभासी बैठक दुपारी १२.३०च्या सुमारास होणार आहे. देशातील अनेक राज्यांत कोरोना वाढल्याने नाईट कर्फ्यू लावावा लागला आहे, त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे.
हे ही वाचा:
माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचे निधन
बलात्कार पीडितांची आई ‘या’ मुख्यमंत्र्याविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात
पंतप्रधान नरेंद्र मोदी, या महामारीच्या उद्रेकानंतर सातत्याने देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आहेत. मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत शेवटचा संवाद लसीकरण मोहिम सुरू करण्याच्या आधी जानेवारी महिन्यात साधला होता.
यावेळी त्यांनी स्पष्ट केले होते, की लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा आरोग्यसेवेतील कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी यांच्यासाठी असून सुमारे तीन कोटी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च सरकार उचलणार आहे. त्याबरोबरच कोणत्याही लोकप्रतिनिधींनी अथवा राजकारण्यांनी यात मध्येच येऊ नये असे देखील सांगितले होते.
देशभरातील लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला मार्चपासून प्रारंभ झाला असून यात ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी असलेल्या नागरिकांना लस देण्यात येत आहे.