पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रीय पंचायतराज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरमध्ये दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे कलाम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान जम्मू काश्मीरमध्ये आले आहेत.
रविवार, २४ एप्रिल रोजी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू येथील विमानतळावर दाखल झाले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पंतप्रधानांनी सांबा जिल्ह्यातील पल्ली पंचायतीच्या कार्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अंदाजे २० हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासविषयक उपक्रमांचे उद्घाटन करून कोनशीला बसवली. पंतप्रधानांनी या वेळी अमृत सरोवर उपक्रमाची देखील सुरुवात केली.
हे ही वाचा:
राणा दाम्पत्यांविरोधात दुसरा गुन्हा दाखल
राणा दाम्पत्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
किरीट सोमय्यांवर झालेला हल्ला चुकीचा
मुंबई पोलीस आयुक्त उद्धव ठाकरेंचे चपरासी आहेत का?
पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी बनिहाल-काझीगुंड रस्त्यावरील बोगद्याचे उद्घाटन पार पडले. सुमारे ३१०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या ८.४५ किलोमीटर लांबीच्या बोगद्यामुळे, बनिहाल आणि काझीगुंड या गावांमधील प्रवास १६ किलोमीटरने कमी होणार आहे आणि त्यामुळे या प्रवासाला लागणारा वेळ देखील सुमारे दीड तासाने कमी होईल. हा ट्वीन ट्यूब प्रकारचा बोगदा असून, दोन्ही जुळे बोगदे एकमेकांविरुद्ध दिशेने एकदिशा वाहतूक करतील. देखभालीची कामे आणि बोगद्यातील प्रवाशांची आपत्कालीन सुटका करण्याच्या हेतूने दर ५०० मीटरवर हे दोन्ही बोगदे एकमेकांशी जोडण्यात आले आहेत. हा बोगदा जम्मू आणि काश्मीर यांच्या दरम्यान सर्व ऋतुंमध्ये संपर्क अखंडितपणे सुरु ठेवेल आणि या दोन्ही भागांमधील प्रवासाचे अंतर कमी करून त्यांना एकमेकांजवळ आणेल.
त्याचबरोबर जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन सुनिश्चित करण्यासाठी या जम्मू-काश्मीर भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी अमृत सरोवर नावाच्या नव्या उपक्रमाची सुरुवात केली आहे. देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात ७५ जलसाठे विकसित आणि पुनर्जीवित करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर सुरु असलेल्या अभियानाच्या सन्मानार्थ केंद्र सरकारने हा आणखी एक अभिनव उपक्रम सुरु केला आहे.