पंतप्रधान मोदींनी लोकसभेत केला हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत केलेल्या भाषणात काँग्रेसवर प्रखर हल्लाबोल केला. तुम्ही मोदी सरकारवर टीका करण्याच्या नादात देशविरोधाची भाषा करू लागला आहात, असा घणाघात मोदींनी काँग्रेसवर केला. काँग्रेसच्या खासदारांनी त्यांच्या या भाषणात विघ्न आणण्याचा वारंवार प्रयत्न केला, पण मोदींनी त्यांच्यावर प्रहार सुरूच ठेवले.
उद्योगपती हे कोरोनाचे व्हेरियन्ट आहेत, असे तुम्ही म्हणता. तुम्ही काय बोलता आहात याचे तरी भान आहे का? कुणासाठी आपण हे बोलतो आहोत, हे तरी ठाऊक आहे का, असे विचारून मोदी म्हणाले, पंडित नेहरूंच्या आणि इंदिरा गांधीच्या काळात सरकारला टाटा बिर्लांची सरकार म्हणत होते. ६०-७० पर्यंत बोलले जात होते. आता त्यांच्याशी (डाव्या पक्षांशी) भागीदारी केली, पण त्यांच्या सवयीही तुम्ही घेतल्या? तुम्हीही त्याच भाषेत बोलता आहात?
मोदी म्हणाले की, मेक इन इंडिया होऊच शकत नाही, असे तुम्ही म्हणता. तुम्ही देशाविरोधात का बोलता? त्याची थट्टा उडवता. पण त्यामुळे तुम्हीच थट्टेचा विषय बनला आहात. मेक इन इंडियामुळे अनेकांना त्रास होतो. पण त्याचा अर्थ कमिशनचा रस्ता , भ्रष्टाचाराचे रस्ते बंद असा आहे. त्यामुळेच मेक इन इंडियाचा विरोध केला जात आहे. भारताच्या क्षमतेला कमी लेखले जात आहे. स्वतः असफल आहेत म्हणून देश असफल व्हावा यासाठी प्रयत्न केला जात आहे.
मोदींच्या भाषणादरम्यान काँग्रेसचे अधीरंजन चौधरी यांनी वारंवार अडथळे आणले. काही वेळेस मोदींनी बसून शांत राहणे पसंत केले. पण मग पुन्हा लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांना खडसावले. तेव्हा मोदी म्हणाले की, विरोधक जेव्हा जेव्हा माझ्या भाषणात गोंधळ घालतात तेव्हा त्यांना कळलेले असते की, आता आपल्याला गंभीर स्वरूपाची जखम होणार आहे. पण काही लोक पळून जातात आणि यांना हे सगळे झेलावे लागते. राहुल गांधी सभागृहात उपस्थित नसल्याची आठवण मोदींनी उपस्थित खासदारांना करून दिली.
मोदी म्हणाले की, काँग्रेसने गरिबीची व्याख्याच बदलली. २०१३मध्ये एका झटक्यात १७ कोटी गरिब लोकांना काँग्रेसने श्रीमंत केले. उदाहारण देतो. पूर्वी रेल्वेत फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास होता. त्यातील थर्ड क्लासला तीन उभ्या रेघा असत. त्यातील एक रेघ काढून टाकली की झाला सेकंड क्लास. तसेच यांनी गरिबीचे केले. काही लोक आता गरीब राहणार नाहीत, असे एका झटक्यात ठरविले गेले.
हे ही वाचा:
अहमदाबाद संघाचे झाले बारसे…’हे’ असणार नाव
या राज्यात उभारणार लता दीदींच्या नावे संगीत अकादमी आणि संग्रहालय
ठाण्यात भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर झळकले
‘सिद्धू यांच्या रक्तात पंजाब, हवे तर कापून बघा’
मोदी म्हणाले की, काँग्रेसला सत्तेत येण्याची इच्छा आहे. पण ती मिळत नाही म्हणून मग नाश करण्याची भाषा ते करतात. पण त्यापायी देशात ते असे बीज पेरत आहेत जे देशाला बरबाद करू शकते. मागील अनेक वर्षात काँग्रेसच्या सर्व हालचाली बघितल्या तर त्यांचा गेम प्लान स्पष्ट होतो. असे अनेक आले नी गेले. स्वार्थ साध,ला पण देश अजरामर आहे. देशाला काहीही होणार नाही. देश एक होता, श्रेष्ठ होता, एक आहे आणि श्रेष्ठ राहील.