विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री उशीरा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यात राज्यातील विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली, त्यानंतर ही भेट झाल्याचं कळत आहे.
देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यातील ही भेट राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर असण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सुरु असलेल्या घडामोडींची नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना माहिती दिली असावी. राज्यात यापुढे काय पावलं उचलावी, या राजकीय स्थितीचा फायदा घेता येईल का? याचीही चर्चा झाली असल्याची दाट शक्यता आहे.
हे ही वाचा:
उरातला साधेपणा हे मनोहर पर्रिकरांचे वैशिष्ट्य होते- अतुल भातखळकर
सचिन वाझेंनी वापरलेला शर्ट एनआयएच्या ताब्यात
उत्तराखंडमध्ये रेल्वे अचानक उलट धावली
काल देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत मुंबई पोलीस आयुक्तांची बदली, सचिन वाझे प्रकरणावर सरकारवर सडकून टीका केली. “मुंबई पोलीस आयुक्तांची तर बदली केली. पण, सचिन वाझे यांना ऑपरेट करणारे सरकारमधील जे आहेत, त्यांचा शोध घेणं गरजेचं आहे.” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच, “२०१८ मध्ये मी मुख्यमंत्री असताना सचिन वाझे यांना सेवेत पुन्हा घेण्यास शिवसेनेचा दबाव होता. परंतु हायकोर्टाच्या आदेशामुळे निलंबित असलेल्या वाझेंना पुन्हा घेण्यास मी नकार दिला होता.” असेही त्यांनी काल सांगितले.
सचिन वाझे प्रकरणावरून आघाडी सरकारमध्ये तंटे वाढत असल्याचं कळतंय. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हे सरकार तीन महिन्यात जाणार असल्याचंही सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर, या बैठकीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.