गरिबांसाठी अन्नपुरवठा, त्यांच्यासाठी स्वच्छतागृहांची उभारणी, स्वच्छ पिण्यायोग्य पाण्याची व्यवस्था, आरोग्याच्या दृष्टीने सुविधा, रस्ते बांधणी, छोट्या शेतकऱ्यांचा विचार या गोष्टी सरकारने करणे अपेक्षित आहे. व्यवसाय करण्याचे काम सरकारचे नव्हे ही महत्त्वपूर्ण बाब भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितली.
१० फेब्रुवारीला होत असलेल्या विविध राज्यांच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांनी या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्या भूमिका मांडल्या. भारतातील अनेक सरकारी उद्योगातील समभाग विकून सरकारने खर्चाचे ओझे कमी केले आहे. त्यावेळी सरकारने उद्योग विकले, देश विकला अशी भाषा वापरली जात आहे. त्यालाच एकप्रकारे पंतप्रधानांनी हे उत्तर दिले आणि सरकारचे प्राधान्यक्रम कोणते आहेत, हे स्पष्ट केले.
सध्या ईडी वगैरेसारख्या संस्थांवर आरोप होतात, त्याबद्दल पंतप्रधान म्हणाले की, तपास यंत्रणा या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत तपास करून त्यातून देशाची संपत्ती परत मिळविण्याचा प्रयत्न करतात, त्यासाठी सरकारचे कौतुक व्हायला हवे.
उत्तर प्रदेशात एकेकाळी गुंडाराज सुरू असल्याचे बोलले जात होते. महिलांना संध्याकाळी घरातून बाहेर पडणेही मुश्कील होते, पण आता काय स्थिती आहे, या प्रश्नावर मोदी म्हणाले की, आता अंधार पडल्यानंतरही महिला घराबाहेर पडू शकतात. सुरक्षेच्या दृष्टीने महिलांचा सरकारवर हा विश्वास खूप महत्त्वाचा आहे.
हे ही वाचा:
विधानसभा निवडणूक मतदानापूर्वी मुख्यमंत्री योगींनी केला खास फोटो शेअर
आदित्य ठाकरे म्हणतात, शाळा-कॉलेजच्या नियमांनुसारच गणवेश असावा
काय आहेत ‘हिजाब’बाबत घटनात्मक तरतुदी आणि इतर देशांतील स्थिती?
सचिन वाझे म्हणतो, मला अनिल देशमुखांनीच वसुलीचे आदेश दिले!
भाजप पराभूत होत होत जिंकलो आहे. आम्ही अनेक पराभव पाहिले. डिपॉझिट जप्त झाले आहेत. त्यावेळी जनसंघ होता. दिवा ही निशाणी होती. मिठाई वाटत होते काही लोक. आम्ही विचार केला की, अरे हरल्यावरही मिठाई का वाटत आहेत. तर तीन जागी डिपॉझिट वाचले होते. अशा परिस्थितीतून भाजपा पुढे आलेला पक्ष आहे.
मोदी म्हणाले की, आम्ही पराभूत होऊ किंवा जिंकू पण निवडणुका या आमच्यासाठी खुली विद्यापीठे आहेत. तिथे आम्हाला आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळते.
मोदी यांनी या मुलाखतीत पुन्हा एकदा परिवारवादावर टीका केली. उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष हा परिवारवादी आहे. राममनोहर लोहिया, जॉर्ज फर्नांडिस यांच्या कुटुंबातील कुणी कधी राजकारणात दिसले का? पण समाजवादी पक्षातील सगळे नेते हे एकाच परिवारातील आहे. मला एकदा एकाने चिठ्ठी पाठवली त्यात म्हटले होते की, समाजवादी पक्षात एकाच कुटुंबातील ४० लोक विविध पदांवर विराजमान आहेत. काश्मीर, हरयाणा, झारखंड, उत्तर प्रदेश, तामिळनाडूत असा परिवारवाद आहे. घराणेशाहीचे राजकारण हे भारतातील लोकशाहीचा शत्रू आहे.