येत्या २८ मे रोजी होत असलेल्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर विरोधकांनी बहिष्कार घातलेला असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या तीन देशांच्या दौऱ्यात सत्ताधारीच नव्हेत तर त्या देशातील विरोधकही कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते असे सांगत भारतातील विरोधकांना आरसा दाखविला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दिल्लीच्या पालम विमानतळावर गुरुवारी आगमन झाले. त्यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. पंतप्रधान जपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया अशा तीन देशांच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यावरून परतल्यावर पंतप्रधान म्हणाले की, केवळ ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधानच नव्हेत तर देशाचे माजी पंतप्रधान, विरोधी पक्षही त्या कार्यक्रमांना हजर होते. आपल्या देशासाठी त्यांनी या कार्यक्रमांना उपस्थिती दर्शविली होती. पंतप्रधानांनी हे वक्तव्य करताना भारतात नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार घालणाऱ्या विरोधकांना एकप्रकारे कानपिचक्या दिल्या.
गुरुवारी सकाळी त्यांचे आगमन झाले. त्यावेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाही उपस्थित होते. पंतप्रधान म्हणाले की, मी जेव्हा माझ्या देशाबद्दल या दौऱ्यात सांगितले तेव्हा त्याबद्दल माझ्या मनात कोणताही किंतु नव्हता. उलट आत्मविश्वास आणि अभिमानाने मी देशाची महती सांगितली. कारण तुम्ही हे सरकार बहुमताने निवडून दिले आहे. त्यामुळे परदेशात भारताच्या प्रगतीचे चित्र मांडणे हे माझे कर्तव्य आहे. जेव्हा मी तिथे भारताबद्दल बोलत होतो तेव्हा तेथील लोकांचा माझ्यावरच नव्हे तर १४० कोटी लोकांवर विश्वास होता.
हे ही वाचा:
कोकणातील गाड्यांचे आरक्षण एका मिनिटात कसे फुल होते?
वीजचोरी पकडणाऱ्या महावितरणच्या भरारी पथकावर हल्ला
मुंबई इंडियन्स ‘आकाश’ भरून पावले
जितेंद्र आव्हाड हेच करमुसे अपहरण प्रकरणाचे सूत्रधार
मोदी म्हणाले की, जी-२० राष्ट्रांचे अध्यक्षपद भारताकडे आहे याबद्दल या दौऱ्यात परदेशातील नेत्यांना प्रचंड कौतुक होते, त्यांनी भारताचा याबद्दल गौरवच केला. ही तमाम भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.
मोदींनी सांगितले की, भारताची कहाणी ऐकण्यास जग उत्सुक आहे. भारतीयांनी कधीही गुलामीच्या मानसिकतेत जगता कामा नये. त्यामुळे आपली संस्कृती, परंपरा याबद्दल बिनधास्त बोलले पाहिजे. परदेशातील मंदिरे, प्रार्थनास्थळांवर कुणी आक्रमण करत असेल तर ते सहन केले जाणार नाही, असेही आपण तिथे ठणकावून सांगितले आहे, असेही मोदी म्हणाले.