पाटण्यात पुन्हा मोदीविरोधाचे महागठबंधन

उद्धव ठाकरे, शरद पवार, केजरीवाल, राहुल गांधी, ममता बॅनर्जी उपस्थित राहणार

पाटण्यात पुन्हा मोदीविरोधाचे महागठबंधन

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सरकार आल्यानंतर त्यांना पराभूत करण्यासाठी विरोधक जंगजंग पछाडत आहेत. प्रत्येकवेळी महागठबंधनाच्या रूपात एकत्र येणारे विरोधक पाटण्यात शुक्रवारी गोळा होणार आहेत. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला पराभूत करण्यासाठी ही एकजूट केली जात आहे.

विविध विरोधी पक्षांचे नेते या बैठकीसाठी येणार असून त्यात राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, उद्धव ठाकरे हेदेखील सहभागी होणार आहेत. सर्वांचे लक्ष असेल ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे. केजरीवाल हे केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरुद्ध विरोधकांना आपल्या बाजुला वळविण्यासाठी प्रामुख्याने पाटण्यात जाणार आहेत. पण अध्यादेशाविरोधात काँग्रेसचा पाठिंबा केजरीवाल यांना मिळालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे पाहिले जात आहे.

 

बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे नेते नितीश कुमार यांनी ही बैठक बोलावली आहे. अनेक नेत्यांनी तळ्यातमळ्यात करता करता शेवटी या बैठकीसाठी होकार भरला आहे. त्यामुळे विरोधकांची एकजूट कशी असेल याचे दर्शन यानिमित्ताने घडणार आहे. सुमारे २० पक्षांच्या विरोधी नेत्यांचा एक गट शुक्रवारी देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या तथाकथित मेगा बैठकीसाठी पाटणा येथे एकत्र येणार आहे. जिथे ते पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सामोरे जाण्यासाठी संयुक्त रणनीती आखणार आहेत.

 

देशाच्या दहा दिशांना दहा तोंडे या अवस्थेत असलेले सर्वच विरोधी पक्ष यानिमित्ताने एकत्र येऊन भाजपचे टेन्शन वाढवू शकतील का, याची चर्चा आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, बसपच्या मायावती, बीआरएसचे नेते के. चंद्रशेखर राव आदि नेते या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत.

हे ही वाचा:

आदिपुरुषची घसरण थांबता थांबेना!

बेकायदा स्टॉक एक्स्चेंज ‘डब्बा ट्रेंडिंग’ चा डब्बा गुल

मोदींसोबत योगसत्राचे नेतृत्व करण्याचा प्रसंग ‘सन्मानक्षण’

मणिपूर संघर्षावर २४ जून रोजी सर्वपक्षीय बैठक

 

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) नेते एमके स्टॅलिन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) प्रमुख शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टी (आप) सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री आणि आप नेते भगवंत मान, झारखंडचे मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) नेते हेमंत सोरेन आणि जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (जेकेपीडीपी) प्रमुख मेहबूबा मुफ्ती शुक्रवारच्या बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे. गुरुवारी मेहबूबा मुफ्ती, अरविंद केजरीवाल, भगवंत मान आणि ममता बॅनर्जी पाटण्यात येणार आहेत.

विरोधकांच्या मेळाव्याची तयारी

बिहारचे अर्थमंत्री आणि JD(U) नेते विजय कुमार चौधरी म्हणाले की, विरोधकांच्या बैठकीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.विरोधी पक्षनेते बिहार सरकारच्या राज्य अतिथीगृहात राहणार असून त्यांच्या राहण्याची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. बिहारच्या मंत्र्याने दिलेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होणार आहे.

विजय कुमार चौधरी म्हणाले की, विरोधी पक्षांच्या नेत्यांना बिहारी पदार्थ आणि त्यांच्या आपापल्या राज्याचे स्वादिष्ट पदार्थ भोजनासाठी वाढले जाणार आहेत. पाटणा येथील भाजप कार्यालयाबाहेर पक्षाने विरोधी पक्षांच्या एकतेची खिल्ली उडवणारे पोस्टर लावले होते. एका पोस्टरमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांची “कोणतीही दूरदृष्टी” नसलेले नेते एकत्र येत आहेत अशा वाक्याने या कथित विरोधी पक्षांच्या बैठकीची खिल्ली उडवली आहे. “जनतेच्या हितापेक्षा यांना आपल्या खुर्च्यांची जास्त काळजी आहे”, अशी पुस्तीही त्याला जोडण्यात आली आहे. भाजपाचे खासदार सुशीलकुमार मोदी यांनी या एकजुटीची खिल्ली उडविली असून नीतिश कुमार यांनी आपल्या घरी वरात बोलावली आहे अशी टीका त्यांनी केली आहे.

Exit mobile version