देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. या दौऱ्यात त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री, एनएसएसह एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील जात आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांची भेट घेणार आहेत. सोबतच क्वाड लीडर्स मीट आणि यूएनजीएसोबत पहिली बैठक देखील घेणार आहेत. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी मोदी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यातील कार्यक्रमांची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, पंतप्रधान मोदी आज बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी आयोजित केलेल्या कोरोना कोरोना वैश्विक शिखर संमेलनात सहभागी होतील.
त्यांच्या माहितीनुसार मोदी आणि बायडन यांच्यात २४ सप्टेंबर रोजी द्विपक्षीय बैठक होईल. या बैठकीत पंतप्रधान मोदी आणि बायडन भारत-अमेरिकेतील संबंधांवर चर्चा करतील. तसेच या बैठकीत दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक संबंध मजबूत करणे, सुरक्षेसंबंधी तसेच स्वच्छ ऊर्जा भागिदारीला प्रोत्साहन देण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजीत डोभाल आणि विदेश सचिव श्रृंगला देखील असणार आहेत.
पंतप्रधान मोदी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेलाही संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांची पहिल्यांदा भेट घेतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पंतप्रधान मोदींना व्हाईट हाऊसला भेट देण्याचे औपचारिक निमंत्रण आधीच दिले आहे. या बैठकीमध्ये अफगाणिस्तान आणि सीमाभागातील अन्य मुद्यांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. सीमापार दहशतवाद आणि कट्टरता यासारख्या मुद्द्यांवरही व्यापक चर्चा होण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्र संघाची ७६ व्या महासभेमध्ये अफगाणिस्तान, हवामान बदल आणि कोरोना बद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी २५ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करतील.
हे ही वाचा:
कितीही वॉर्ड पुनर्रचना करा, मुंबईसह अन्य महानगरपालिकेत आम्हालाच यश मिळणार
पंजाब राजस्थानच्या सामन्यात बॉलर्सचा बोलबाला
हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची कागदपत्रे ईडीकडे सुपूर्द
बायडन यांच्या भेटीनंतर पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचीही भेट घेतील. सोबतच या दौऱ्यात क्वाड शिखर परिषद व्हाईट हाऊस येथे आयोजित केली जाईल. जिथे चार देशांच्या (अमेरिका , भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया) नेत्यांची प्रथमच प्रत्यक्ष बैठक होणार आहे. पंतप्रधान मोदी क्वाड समिटमध्येही सहभागी होतील.