आज ईशान्येला पहिले एम्स आणि आसामला ३ नवीन वैद्यकीय महाविद्यालये मिळाली. आधुनिक संशोधनासाठी ५०० खाटांच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची पायाभरणी देखील आयआयटी-गुवाहाटीच्या सहकार्याने करण्यात आली आहे. आसाममधील लाखो मित्रांना आयुष्मान कार्ड देण्याचे काम मिशन मोडवर सुरू झाले आहे. गेल्या ९ वर्षांत आम्ही पायाभूत प्रकल्पांवर काम केले आहे आणि म्हणूनच प्रत्येकजण कनेक्टिव्हिटीशी संबंधित पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांबद्दल बोलतो असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील पहिल्या एम्सच्या लोकार्पणावेळी उद्गार काढले.
आमच्या सरकारने पूर्वोत्तर भारतात २०१७ मध्ये पहिल्या एम्सची पायाभरणी केली. यापूर्वीच्या सरकारांनी आसामसाठी काहीच केले नसल्याची खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी गुवाहाटीसोबतच कोक्राझार, नलबारी आणि नागाव येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांचे देखील लोकार्पण केले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही जेव्हा देशात गेल्या ९ वर्षात झालेल्या विकासाबद्दल बोलतो तेव्हा काही लोक नाराज होतात. त्यांनीही अनेक दशके देशावर राज्य केले, याचे श्रेय त्यांना का मिळत नाही, अशी त्यांची तक्रार आहे. श्रेयासाठी भुकेलेल्या लोकांनी आणि जनतेवर राज्य करण्याच्या भावनेने देशाचे खूप नुकसान केले आहे. तुमचे सेवक असल्याच्या भावनेने आम्ही काम करतो, त्यामुळे ईशान्य आम्हाला दूर वाटत नाही आणि आपुलकीची भावनाही कायम असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
आज ईशान्येतील लोकांनी पुढे जाऊन विकासाची सूत्रे स्वतः हाती घेतली आहेत. भारताच्या विकासाचा मंत्र घेऊन पुढे जात आहोत. पीएम मोदी म्हणाले की, आम्ही गेल्या काही वर्षांत १५ नवीन एम्सवर काम सुरू केले. यापैकी बहुतांश ठिकाणी उपचार आणि शिक्षण या दोन्ही सुविधा सुरू झाल्या आहेत. एम्स गुवाहाटी हे देखील याचाच एक भाग आहे. यावरून हे स्पष्ट होते की, आमचे सरकार जे काही ठरवते ते पूर्णत्वास नेते. आसामच्या जनतेचे प्रेम इथे खेचून आणत असल्याचे मोदींनी सांगितले. पंतप्रधान म्हणाले की, व्होट बँकेऐवजी आम्ही देशातील जनतेच्या अडचणी कमी करण्यावर भर दिला. आमच्या बहिणींना उपचारासाठी दूरवर जावे लागू नये, हे आमचे ध्येय होते. पैशांअभावी कोणत्याही गरीबाला उपचार पुढे ढकलायचे नाही, असे आम्ही ठरवले होते. विशेष म्हणजे ठरवलेल्या गोष्टी पूर्णत्वास जात असल्याचा आनंद होत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
हे ही वाचा:
देशातील नवीन कोरोना रुग्णांची ११ हजारांच्या पुढे; सक्रिय रुग्णांची संख्येतही लक्षणीय वाढ
अमित शहा आज मुंबईत येणार, पोलिसांचे सतर्कतेचे आदेश
भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे!
…म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती सावरकरांची स्तुती!
याप्रसंगी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, पूर्वी इशान्य भारतातील लोकांना उपचारासाठी दिल्ली, कोलकाता सारख्या मोठ्या शहरांमध्ये जावे लागत होते, त्यामुळे त्यांचा प्रवास वेदनांनी भरलेला होता. आज गुवाहाटीला गुवाहाटी एम्ससह ३ सरकारी वैद्यकीय महाविद्यालये मिळणार आहेत. आता त्याचा वेदनादायी प्रवास संपल्याचे मांडविय यांनी सांगितले.