‘लिजन ऑफ मेरिट’ हा अमेरिकन सरकारचा महत्वाचा सैनिकी पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात भारत-अमेरिका संबंध नव्या उंचीवर पोहोचले, तसेच भारत नवी विश्वशक्ती म्हणून उदयाला आला. यासाठीच नरेंद्र मोदींचा सन्मान करण्यात आला. अमेरीकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पायउतार होता होता हा पुरस्कार दिला आहे. अमेरिकेतील भारतीय राजदूत तरंजीत सिंह संधू यांनी प्रधानमंत्र्यांचे प्रतिनिधित्व करत हा बहुमान स्विकारला.
‘लिजन ऑफ मेरिट’ हा पुरस्कार अमेरिकन सैन्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना दिला जातो. सोबतच अमेरिकेच्या मित्र राष्ट्राचे प्रमुख आणि सैन्याचे अधिकारी यांनाही दिला जातो. पंतप्रधान मोदींसोबत जपानचे माजी राष्ट्राध्यक्ष शिंजो आबे आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनाही हा पुरस्कार देण्यात आला आहे. भारत, जपान आणि ऑस्ट्रलिया हे तिन्ही देश अमेरिकेचे जवळचे मित्र आहेत. भारतीय महासागर आणि प्रशांत महासागर क्षेत्रातील या देशांनी एकत्र येऊन ‘क्वाड ग्रुप’ स्थापण्याचा चर्चा गेल्या काही काळापासून सुरु आहेत. त्यामुळे अमेरिकेने आपल्या मित्रांच्या केलेल्या सन्मानाला एक कूटनीतिक महत्वही आहे.