आंदोलनजीवींमुळे झाले शेतकरी आंदोलन अपवित्र

आंदोलनजीवींमुळे झाले शेतकरी आंदोलन अपवित्र

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला २९ जानेवारी पासून सुरूवात झाली. १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर झाला. त्यानंतर आज लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण झाले.

या भाषणात नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर घणाघाती प्रघात केले. या वेळेला मोदींनी अनेक मुद्द्यांना हात घातला. भारताची ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ या मंत्रावर वाटचाल चालू असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना उत्तर काळात जगाची नवी व्यवस्था निर्माण होईल. त्यात भारताला स्वतःची जागा निर्माण करायची असेल तर आत्मनिर्भर असायला हवे. अशा प्रकारे भाषणाच्या सुरूवातीला आत्मनिर्भर भारतचा नारा दिला. त्याबरोबर ‘व्होकल फॉर लोकल’ लोकप्रिय होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

कोरोना महामारीसारख्या अदृश्य शत्रूशी देखील देशाने एकजूट होऊन दिलेल्या लढ्याबद्दल मोदींनी त्या सर्व व्यवसायांचा अभिमानाने उल्लेख केला. त्याबरोबरच या काळातील लोकांना मदत करण्यासाठी आधार, जनधन योजना इत्यादी योजनांचा वापर झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

याचवेळेस मोदींनी विवादीत शेतकरी कायद्यांवर देखील भाष्य केले. त्यावेळेला मोदींनी बदल कोणी मागितल्यावरच करावेत या वृत्तीवर जोरदार टिका केली. नव्या कायद्यांमुळे जुनी व्यवस्था नष्ट होणार नसून दुसरी पर्यायी व्यवस्था निर्माण होणार आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले.

या भाषणात आंदोलनजीवींवर देखील टिका केली. ती करताना त्यांनी शेतकऱ्यांचे आंदोलन पवित्र असल्याचे सांगितले. मात्र त्यात शिरलेल्या आंदोलनजीवींनी केलेल्या नक्षलवादी, आतंकवाद्यांच्या मुक्ततेच्या मागण्यांमुळे आंदोलन अपवित्र झाले आहे असेही सांगितले.

देशात केलेल्या विविध विकास कामांचा पाढा देखील त्यांनी वाचला. यात देशातील विविध शहरातील मेट्रो, आणि इतर पायाभूत सुविधा, उर्जा क्षेत्रातील प्रगती याबाबत त्यांनी सांगितले. रेल्वेतील डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर याबद्दल सांगितले. देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर विविध पुल आणि रस्ते बांधणी मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांचा असा समाचार घेत असताना, खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने सभात्याग केला.

Exit mobile version