हमीभाव होता, आहे आणि राहील-नरेंद्र मोदी

हमीभाव होता, आहे आणि राहील-नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर बोलत होते. यावेळी त्यांनी कृषी कायदे, शेतकरी आंदोलन आणि शेतीमधील सुधारणा यावर भाष्य केले. नव्या कृषी कायद्यांविषयी बोलताना नरेंद्र मोदींनी २०१४ पासून शेतकऱ्यांसाठी आणलेल्या योजनांचा पाढा वाचला. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात छोट्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भर दिला आंदोलक शेतकऱ्यांना चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन केले. “तर हमीभाव  होता, आहे आणि राहील.” अशी ग्वाही नरेंद्र मोदींनी दिली आहे.

“आम्ही, कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर शेतकरी आंदोलकांच्या संपर्कात आहोत, त्यांच्याशी चर्चा सुरु आहेत. मिळून मिसळून चर्चा करु आणि यातून तोडगा काढू. आंदोलनामुळे वृद्ध शेतकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही याचीही जवाबदारी आंदोलनकर्त्यांनी घेतली पाहिजे.” असे मोदी म्हणाले.

“आज मी संसदेतूनही आवाहन करतो, चर्चेने मार्ग काढू, लोकशाहीत आंदोलनाचा हक्क आहे, आपल्याला आपल्या देशाला पुढे घेऊन जायचं आहे, मागे नाही. या सुधारणांना आपण संधी द्यायला हवी, या परिवर्तनाने लाभ होतो की नाही हे पाहायला हवं. काही कमतरता असेल तर त्यात सुधारणा करु. मंडया अधिक स्पर्धात्मक होतील, याचा शेतकऱ्यांना लाभ होईल, हमीभाव होता, आहे आणि राहील. या पवित्र सभागृहातून आम्ही ही ग्वाही देतो.” असे नरेंद्र मोदी म्हणाले.

Exit mobile version