पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आवाहन
गेली अनेक दशके भारतात विकासाची कामे रखडत रखडत झाली, विलंबाने झाली. महत्त्वाच्या योजना पूर्ण व्हायला वेळ लागला. त्याचा फटका जनसामान्यांना बसला. त्यामुळे यापुढे कामे ही वेगाने व्हायला हवीत, वेळेत पूर्ण व्हायला हवीत, असे आवाहन करतानाच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधीच्या सरकारांनी केलेल्या संथ विकासकामांवर निशाणाही साधला. पुणे येथील विकासकामांचे उद्घाटन आणि शिलान्यास कार्यक्रमासाठी पंतप्रधान पुण्यात आले होते.
पुण्यातील मेट्रो, मुळा मुठा नदी प्रकल्प, ई बस सेवा यांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. त्यानिमित्ताने ते बोलत होते.
ते म्हणाले की, कोणत्याही देशात सुविधा निर्माण करण्यासाठी एक वेग हवा. पण अनेक दशके अशी व्यवस्था राहिली की महत्त्वाच्या योजना पूर्ण व्हायला वेळ लागला. याचा फटका बसला. वेगाने विकास होत असलेल्या भारताने विकासकामांच्या वेगाबाबत विचार केला पाहिजे. त्या अनुषंगानेच गतिशक्ती मास्टरप्लॅन बनविला आहे. बहुतांश वेळा या विकासकामांमध्ये समन्वय नसतो. त्यामुळे वेळ लागतो. त्यामुळे अनेक वर्षांनी योजना पूर्ण होतात आणि नंतर त्याची उपयुक्तता कमी होते. म्हणून या कामांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तरच लोकांच्या समस्या कमी होतील.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदी पुण्यात दाखल; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे केले अनावरण
बीएसएफ जवानाच्या अंदाधुंद गोळीबारात सहा जवान ठार
‘दिशा, सुशांत प्रकरणाबद्दल बोलू नका सांगायला मुख्यमंत्र्यांचा दोन वेळा फोन’
पंतप्रधानांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. पंतप्रधानांचे आगमन झाल्यानंतर उपस्थितांनी त्यांचे मोदी मोदी अशा घोषणा देऊन स्वागत केले. मंचावर उपस्थित असलेले विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुकारताच लोकांनी जयघोष केला. यावेळी मंचावर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते.
पंतप्रधान म्हणाले की, पहिल्यांदा शिलान्यास होत होते तेव्हा कळत नव्हते की कधी उद्घाटन होईल. त्यामुळेच मेट्रो रेल्वेमार्गाचे उद्घाटन ही घटना महत्त्वपूर्ण आहे. कारण यात संदेश आहे की, वेळेवर योजना पूर्ण करता येऊ शकतात.