कायदा सुव्यवस्थाप्रकरणी नोटिसा बजावल्या
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिल्यानंतर ४ तारखेपासून मशिदींसमोर हनुमानचालिसा म्हटली जाणार असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटिसा पाठविण्यास सुरुवात झाली आहे. औरंगाबादमधील मनसेच्या कार्यकर्त्यांना घरी जाऊन अशा नोटिसा देण्यात आल्या असून अक्षय तृतियेच्या दिवशी अशा नोटिसा घरी येऊन दिल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.
औरंगाबादचे मनसे प्रमुख सुमित खांबेकर यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, आमच्या घरी आज अक्षय तृतियेनिमित्त पूजापाठ सुरू आहेत. या दिवशी पोलिसांनी नोटिसा देण्याची काय गरज होती? आम्ही कुठेही पळून गेलेलो नाही. आम्हाला पोलिस स्टेशनला बोलावूनही नोटीस देता आली असती. शिवाय, एवढ्या कार्यकर्त्यांना नोटिसा कशाला असाही सवाल खांबेकर यांनी उपस्थित केला.
हे ही वाचा:
चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल राज ठाकरेंवर गुन्हा
‘राऊतांचा लेख म्हणजे आंब्याच्या झाडाला, काकडी किती लागल्यात मोजण्यासारखे’
जोधपूरमध्ये झेंड्यावरून दोन गटांत राडा
दरम्यान, मुंबईतही अनेक मनसे व भाजपा कार्यकर्त्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.
मुंबई पोलिसांनी दादर, माटुंगा आणि धारावी परिसरात राहणाऱ्या सुमारे ७५ लोकांना सीआरपीसी कलम १४९ अंतर्गत नोटीस दिली आहे. ज्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत त्यापैकी बहुतांश मनसे आणि भाजपचे कार्यकर्ते आहेत.
राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे घेतलेल्या सभेत महाविकास आघाडीवर घणाघात केलाच पण ३ तारखेपर्यंत अल्टिमेटम देत ४ तारखेपासून मशिदींसमोर हनुमानचालिसा म्हटली जाईल, असे म्हटले होते. त्यामुळे आता चार तारखेपासून काय होईल, हे लक्षात घेऊन पोलिसांनी कारवाईला प्रारंभ केला आहे.