महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून येत्या २० नोव्हेंबरला मतदान पार पडेल. तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. याचं पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच मनसे पक्षाकडूनही जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवाजी पार्क या ठिकाणी असलेल्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत आगामी विधानसभा निवडणुका कशा पद्धतीने लढवणार याबद्दल भाष्य केले.
राज ठाकरे म्हणाले की, सर्व राजकीय पक्षांपेक्षा जास्तीत जास्त जागा आम्ही लढणार आहोत. विधानसभा निवडणुकीनंतर मनसे नक्कीच सत्तेत असेल, असा विश्वास यावेळी राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. जाहीरनामा लवकरच जनतेसमोर येईल आणि त्यात काय असेल हे तेव्हाच समजेल, असेही राज ठाकरेंनी म्हटले. “सर्व राजकीय पक्षांपेक्षा सर्वात जास्त जागा आम्ही लढणार आहोत. किती काय हे लवकरच समजेल. लढवायच्या म्हणून लढवत नाही. २०१४ ला लढवल्या. २००९ लाही लढवल्या. मी युती आघाडी बद्दल आता काहीही बोलणार नाही,” असं म्हणत राज ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
हे ही वाचा :
प्रभू श्रीराम लल्लांच्या दर्शनासाठी इस्रायली राजदूत अयोध्येत!
लोखंडवाला परिसरात इमारतीला लागलेल्या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू
बेबी पावडरमुळे कर्करोग झाल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीला जॉन्सन अँड जॉन्सनकडून मिळणार नुकसान भरपाई
मशिदीमध्ये ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने कुणाच्याही धार्मिक भावना दुखावत नाहीत
राज ठाकरे यांनी टोल माफीच्या मुद्द्यावर भाष्य करताना म्हटले की, “टोल माफी ही आमचीच मागणी होती. काँग्रेस सरकारच्या काळापासून आम्ही टोल माफीसाठी आवाज उठवला होता. सरकारने हा निर्णय घेतला, याचे लोकांना समाधान आहे. मात्र, हा निर्णय निवडणुकीच्या तोंडावर घेऊन मतं मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय, असं वाटू नये. अनेक राजकीय नेते श्रेय घेण्यासाठी पुढे येतील, पण प्रत्यक्षात निर्णय घेण्याची गरज आहे. अनेक राजकीय पक्षांनी टोल नाके बंद करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यापैकी काहींनी फक्त बोलून दाखवलं, प्रत्यक्षात काहीच केलं नाही,” असं म्हणत राज ठाकरे यांनी टोल माफीच्या निर्णयाचे स्वागत केले.