राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुण्यात एक मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आक्रमक चेहरा अशी ओळख असलेल्या रूपाली पाटील यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षाच्या सर्व पदांसोबतच प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याच्या तोंडावरच पाटील यांचा राजीनामा बाहेर आला आहे. त्यामुळे याची चांगलीच चर्चा रंगते ना दिसत आहे
रूपाली पाटील या मनसेच्या आक्रमक महिला नेत्यांपैकी एक मानल्या जातात. त्या कायमच राज ठाकरे यांच्याशी प्रामाणिक असलेल्या आणि निकटवर्तीय असल्याचे मानले गेले आहे. विद्यार्थी दशेपासून राजकारणात सक्रिय असलेल्या पाटील आधी शिवसेनेत कार्यरत होत्या. पण राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली तेव्हा पाटील यांनी देखील शिवसेनेला रामराम ठोकला. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. मनसेच्या तिकिटावर त्या नगरसेवक म्हणूनही निवडून आल्या होत्या.
हे ही वाचा:
चीनच्या ‘आक्रमक कृती’विरुद्ध अमेरिकेचे महत्वाचे वक्तव्य
चार धाम महामार्गाच्या रुंदीकरणास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
राहुल गांधींची शिवाजी पार्कवरची सभा रद्द
पाटील यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरीही पक्षांतर्गत वाद आणि गटबाजी यांना कंटाळून रूपाली पाटील यांनी राजीनामा दिल्याचे म्हटले जात आहे. पुणे महानगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना रूपाली पाटील यांनी मनसे सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. रूपाली पाटील या लवकरच नव्या पक्षात प्रवेश करणार असून तो पक्ष कोणता असेल हे येणाऱ्या काळात जाहीर केले जाईल असे सांगण्यात येत आहे.
दरम्यान राज ठाकरे यांचा महाराष्ट्रभर संघटनात्मक दौरा सुरू आहे. या दौऱ्याचा भाग म्हणून आज म्हणजेच बुधवार, १५ डिसेंबर रोजी राज ठाकरे हे पुण्यात येत आहेत. राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या तोंडावरच रुपाली पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे मनसेला हा मोठा धक्का मानला जात आहे.